वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला २५ मे पर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना दिलासा

0
524

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राज्य सरकारने वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला २५ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने परीपत्रक जारी केले आहे.  वैद्यकीय आणि दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकची मुदतवाढ मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती करण्याचा विचार आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

२०१९-२० या वर्षाच्या वैद्यकीय आणि दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी आरक्षण लागू करता येणार नाही, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. यावर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने प्रवेश प्रक्रियेला २५ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात दंत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. याच मुद्द्यावरून मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आंदोलन  पुकारले आहे. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा देत प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आश्वासन काल राज्य सरकारकडून देण्यात आले होते.