वेदांत-फोक्सकॉन गुजरातला गेला, पाप कोणाचे ??? थर्ड आय- अविनाश चिलेकर

0
358

महाराष्ट्र – माझ्याकडे डीजी आहे..ढोल-ताशा आहे..दहिहंडी आहे…गणपती आहे…नवरात्री आहे…भोंगे आहेत…मला आमदार झाल्यासारखे वाटतयं आहे… अब्दुल सत्तार आहेत…डोंगार-झाडीवाले आमदार शहाजी पाटील आहेत…हाफकिन नावाचा माणूस आहे…आणि ५० खोके सुध्दा आहे…तुमच्याकडे काय आहे…
गुजराथ – माझ्याकडे वेदांत- फोक्सकॉन आहे…

वरचा उपहासात्मक संपूर्ण संवाद हा ट्विट केला आहे तो, जेष्ठ विचारवंत, व्याख्याते डॉ.विश्वंभर चौधरी यांनी. महाराष्ट्राच्या वाट्याचा वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प आयत्यावेळी गुजराथने अक्षरशः पळवला. महाराष्ट्राचे भंपक, निलाजरे सत्ताधारी हात चोळत बसले. तब्बल दीड लाख कोटींची गुंतवणूक, दोन लाखावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रोजगार आणि १६० पेक्षा अधिक छोटया कंपन्या ज्या प्रकल्पामुळे येणार होत्या तो प्रकल्प एका रात्रीत मोदी-शहा यांनी गुजराथकडे वळवला. गुजराथ सरकारने २९ हजार कोटींच्या सवलती दिल्या तर महाराष्ट्राने त्यापेक्षा अधिक म्हणजे ३९ हजार कोटींच्या सवलती देऊनही प्रकल्प गुजराथला जातो याचे आश्चर्य वाटते. तळेगाव एमआयडीसी मधील अत्यंत मोलाची मोक्याची जागा आणि गुजराथमधील जागा याचीही तुलना होऊ शकत नाही. त्याहिपेक्षा महत्वाचे म्हणजे अगदी करार मदार सगळे अंतिम टप्प्यात असताना कुठे माशी शिंकली ते लोकांना समजले पाहिजे. राज ठाकरे यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखले आणि चौकशीची मागणी केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, महाआघाडीने दोन वर्षांत त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला नव्हता म्हणून प्रकल्प तिकडे गेला. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकरावर खापर फोडले. तिसरीकडे अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी विरोधी पक्षाच्या नेते मंडळींनी राज्य सरकारच्या नावाने शंख केला. खरे तर, महाराष्ट्राला खाली पहायला लावणारी ही घटना आहे. महाराष्ट्र, मराठी माणसावर गुजराथी नेत्यांनी केलेली कुरघोडी आहे. मराठी अस्मिता चिरडण्याचा हा कुटील डाव आहे. आजा वेदांत-फोक्सकॉन गेला उद्या मुंबईचे जेएनपीटी बंदर, शेअर मार्केटसह सगळे अहमदाबाद, सुरत, बडोद्याला गेले तरी आश्चर्य नको. मुंबई महाराष्ट्राकडे राहिली याची खंत गुजराथ्यांना आहे आणि ते आता त्याची वसुली करत आहेत. मोदी-शहा त्यांच्या मदतीला आहेतच. मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचे हे कारस्थान आहे. प्रश्न शिवसेना किंवा भाजपा असा राजकारणाचा नाही, तर मराठी माणसाच्या जीवनमरणाचा आहे.

नाना पटोले म्हणतात ते १०१ टक्का पटते की, उद्या आख्खी मुंबई गुजराथमध्ये गेली तरी वाईट वाटू नये.
आज देशाचे ग्रोथ इंजिन मुंबई आहे. देशाच्या एकूण उत्पन्नाचा सर्वाधिक वाटा मुंबईतून केंद्राला जातो. तमाम देशी-विदेशी कंपन्यांची कार्पोरेट कार्यालये मुंबईत आहेत. आणि त्यातील बहुतांश व्यापारी उद्योजकसुध्दा गुजराथी, मारवाडी आहेत. ही मंडळी केवळ व्यापारासाठी गुजराथ, राजस्थान सोडून मुंबईत आलीत. त्यांना त्यांची अस्मिता खुणावते. उद्या असे एक एक उद्योग तिकडे गेले तर त्यांनाही ते पाहिजे. या विषयावर मतदान घ्यायची वेळ आली तर ही जनता प्रादेशिक मुद्यावर भाजपाच्या बाजुनेच उभी राहणार. महाराष्ट्र, मराठीचा द्वेष पूर्वी होता आणि आजही तो नसानसात असलेली मंडळीच हे निर्णय करतात. एक टेल्को मोटर आली आणि पिंपरी चिंचवड शहरात सहा हजारावर छोटे-मोठे उद्योग सुरू झाले. नंतरच्या काळात जनरल मोटर्स, मर्सिडीस बेंझ, फोक्सव्हॅगन, फियाट, जेसीबी अशा वाहन निर्मिती कंपन्या तळेगाव, चाकण, रांजणगाव या पट्ट्यात आल्या आणि सुमारे १० हजारावर छोट्या मोठ्या कंपन्यांतून किमान १० लाखावर रोजगार मिळाला. वेदांत फोक्सकॉन तेळागावत आली असती तर या ओद्योगिकरणावर सोन्याचा कळस चढला असता. मोदी शहा यांना ते नको होते, असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्रात भाजपाची एकहाती सत्ता आली तर पुढे काय होईल याची ही झलक तर नाही ना, अशीही आता शंका येते. शिंदे यांच्यासारखे शिवसेनेतून फुटून आलेले मुख्यमंत्री हाताशी धरून भाजपा आणि मोदी-शहा आपले इप्सित साध्य करत आहेत, असे राहून राहून वाटते. उद्या शिंदेंना बाजुला करून २०२४ मध्ये भाजपाकडे राज्याची सत्ता घ्यायच आणि नंतर मराठी घोषणेपुरती ठेवायची. `जय महाराष्ट्र करा कष्ट आणि व्हा नष्ट`असे गंमतीने शिवसेनेच्या कार्यकरर्त्याला म्हटले जाते. शिंदे तीच घोषणा प्रत्यक्षात आणत आहेत. मराठी माणूस दुखावला म्हणून मोदी-शहा यांच्या तोंडावर राजीनामा फेकून द्यायची हिंमत त्यांच्यात नाही. हे सगळे आता शिवसेनेच्या पथ्यावर पडले किंवा त्यातून मराठी माणूस शिवसेनेच्या बाजुने उभा ठाकला तर भाजपालाही आश्चर्य वाटू नये. दोन-अडिच महिन्यांत शिंदे यांनी आपला वकूब दाखवून दिला. दोन वर्षे दहिहंडी, गणपती, नवरात्र साजरे झाले नाही आता ते दणक्यात होईल, पण दोन लाख मराठी युवकांचा रोजगार गेला त्याची भरपाई शिंदे करू शकत नाहीत. त्यामुळे आता शिंदे आणि त्यांचे चाळीस साथीदारांचे भवितव्यसुध्दा या निर्णयाने अंधारात गेले आहे. हजार रुद्राक्षाच्या माळा किंवा भगवी शाल लपेटून शिंदेंचे आमदार हिंदुत्वाचा जागर आणि बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचे नाटक वठवतील, पण वेदांत-फोक्सकॉन आणू शकणार नाहीत. कारण या मंडळींची अवस्था आता अगदी केवीलवाणी आहे. भाजपाच्या ताटाखालची मांजरे झाली आहेत, असे म्हटले तरी वाईट वाटू नये.