वेतन व नोकरी कपाती विरोधात आयटी कर्मीचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा

0
331

पुणे, दि. १२ (पीसीबी) : नोकर कपात, वेतन कपाती विरोधात आता देशभरातील आयटी कर्मीचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयटी कर्मचाऱ्यांनी ‘जस्टीस फॉर एम्पलॉईज’ हे ऑनलाईन आंदोलन सुरु केलं आहे. नोकरी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. या आंदोलनात आतापर्यंत देशभरातील तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरुसह इतर शहरातील आयटी कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिनेटनं याविरोधात आवाज उठवला आहे.

लॉकडाऊनमुळे आयटी उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची पगार कपात केली. तर काहींना नोकरी गमवावी लागली आहे. पुणे-मुंबईतील 68 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली. राज्यात 6 लाख आयटी कर्मचारी असून साडेतीन ते चार लाख पुण्यात आहेत. पुणे परिसरातील विविध आयटी कंपनी, बीपीओ आणि केपीओत ते काम करतात.

अनेक कंपन्यांनी 50 टक्‍क्‍यांपर्यंत वेतन कपात केली आहे. तर काही कर्मचाऱ्यांची नोकरी गेली. यासंदर्भात सरकारनं कर्मचारी अथवा वेतन कपात न करण्याचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर कामगार आयुक्तांनी काही नामांकित कंपन्यांना नोटीस बजावल्या. मात्र आयटी कंपन्यांनी या नोटीसला केराची टोपली दाखवली. आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली आहे. सुमारे ४० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात असल्याचा अंदाज आहे.

सद्यस्थितीत अनेक कंपन्यांमध्ये ठरवून दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम सुरु आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. मात्र यामध्ये अनेक अडचणी असल्याचे कर्मचारी सांगतात. टीसीएस सारख्या कंपनीने कर्मचाऱ्यांना आता वर्क फ्रॉम होम जवळपास कायम स्वरुपी केले आहे. त्यातून कर्मचाऱ्यांवर होणारा मोठा खर्च बचत होते आणि नफ्याचे प्रमाण वाढते असे लक्षात आल्याने आता अनेक कंपन्यांनी याच पध्दतीने कामकाज सुरू केले आहे.