वृक्ष गणनेची माहिती घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर महापालिका आयुक्तांची अक्षरशः अरेरावी, व्हिडीओ क्लिप व्हायरल

0
319

पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – नामफलकावर शाईफेक करणाऱ्या नगरसेविकेसह आंदोलक गृहिनींना १२ दिवसांचा तुरुंगवास घडविणाऱ्या, पत्रकार परिषद अर्धवट सोडून जाणाऱ्या महापालिका आयुक्तांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. वृक्ष गणनेच्या रखडलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी आलेल्या रयत विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना महापालिका आय़ुक्त राजेश पाटील यांनी खूप अरेरावीची भाषा वापरली आहे. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर, मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही, असे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य पाटील यांनी केले आहे. या कार्यकर्त्यांना अरेतुरेची आणि अरेरावीचीही भाषा वापरली आहे. आयुक्तांच्या या संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून आयुक्त चांगलेच गोत्यात आले आहेत.

पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील झाडांची २००५ ते २०१७ या कालावधीत गणना झाली नाही. तत्कालीन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ११ जानेवारी २०१८ रोजी सॅटेलाईट इमेजद्वारे वृक्ष गणना करण्याचा निर्णय घेतला. झाडाचे नेमके ठिकाण, आकार, उंची, वयोमान, एकत्रित संख्या आदी माहिती संकलित करण्याचे ठरले. या कामी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. सहा कोटी ८० लाख ५३ हजार ५५९ खर्चाचे कंत्राट मेसर्स टेराकॅन इकोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मिळाले. कंत्राटाच्या प्रारंभीच ठेकेदाराला सॉफ्टवेअर, यंत्रसामुग्री खरेदीसाठी २ कोटी रुपये अदा करण्यात आले. या ठेकेदाराने दोन वर्षात वृक्ष गणना पुर्ण करण्याचे आणि पाच वर्षे देखभालीचे काम करणे बंधनकारक होते. मात्र, कालावधी संपुनही काम अर्धवट अवस्थेत आहेत. या दिरंगाईबाबत ठेकेदाराला २ लाख ७४ हजार रुपये आणि २ लाख ३४ हजार रुपये असा दंड आकारण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या वृक्ष गणनेच्या कामाबाबत माहिती घेण्यासाठी तसेच काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी रयत विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते रवीराज काळे, ऋषीकेश कानवटे, ओंकार भोईर, सुर्यकांत सरवदे हे शनिवारी (दि.९) महापालिका आयुक्तांची भेट घेतली. शहरातील वृक्ष गणनेचे काम २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही ते झाले नाही. वृक्ष गणनेचे काम करणाNया ठेकेदाराने वेळेत काम पुर्ण केले नाही. त्यामुळे त्यावर कारवाई करावी. तसेच या ठेकेदाराला मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्याने या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी हे कार्यकर्ते करत होते. तसेच ठेकेदरांनी हे काम पुर्ण का केले नाही, महापालिका ठेकेदारांना पाठीशी घालते आहे का, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे आयुक्तांचे पित्त खवळले. संतप्त झालेल्या आयुक्तांनी, तुला काय समजायच ते समज. मला नको सांगू. मी काय तुला उत्तर द्यायला बांधील नाही, अशी अरेरावीची भाषा वापरली. त्यावर तुम्ही महापालिकेचे आयुक्त आहात, तुम्ही आम्हाला उत्तर द्यायला हवे, असे कार्यकत्र्यांनी सांगितले. त्यानंतर मी महापालिकेशी अकाऊंटेबल आहे, तुम्हाला नाही, असे सुनावले.

आयुक्तांच्या दुरुत्तरांचा ‘व्हीडीओ व्हायरल’
रयत विद्यार्थी परिषदेच्या कार्यकत्र्यांनी महापालिका आयुक्तांच्या अरोरावीचा व्हीडीओ फेसबूकवर व्हायरल केला आहे. त्याचबरोबरच त्यांना शहरातील रखडलेल्या कामांबाबत आणि महापालिकेत चाललेल्या भ्रष्टाचाराबाबत सोशल मीडीयावर प्रश्नही विचारले आहे. हा व्हीडीओ पाहून सर्व स्तरांतून आयुक्तांच्या ‘तोडपाटीलकीचा’ निषेध केला जात आहे.

आयुक्तांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी
हिंदुस्थानी प्रशासकीय सेवेतील (आयएएस) राजेश पाटील हे मूळचे जळगावचे असले तरी त्यांची मूळ सेवा ओरिसा राज्यात आहे. सध्या ते प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आले आहेत. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा पुर्वानुभव नसलेल्या पाटील यांचा पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. मात्र, आयुक्त पदापेक्षा त्यांचा खाक्या जिल्हाधिकारी म्हणूनच असल्याच्या तक्रारी आहेत.नगरसेवक असो की सामाजिक कार्यकर्ते प्रत्येकाचा ते उपमर्द करतात, दुरुत्तरे करतात.प्रचंड ‘इगोस्टीक’ अशी त्यांची राजकीय – प्रशासकीय वर्तुळात ख्याती आहे. त्यांच्या वादग्रस्त कार्यशैलीची तक्रार शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हासंघटक सुलभा उबाळे यांनी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तर, आरोग्य सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणाNया अ‍ॅड. सांगर चरण यांनीही आयुक्तांविरोधात थेट केंद्रीय कार्मिक मंत्रालयाकडे पुराव्यानिशी गाऱ्हाणे मांडले आहे. आता, त्यात रयत विद्यार्थी परिषदेची भर पडली आहे. राजेश पाटील हे महापालिकेला ‘पाटलाचा वाडा’ समजत असल्यासारखे वागत असल्याचा आरोप करत त्यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असल्याचे रवीराज काळे यांनी म्हटले आहे.