विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडीच्या २२० जागांबाबत एकमत – जयंत पाटील

0
396

पुणे, दि.७ (पीसीबी) –  विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असून सध्या २२० जागांबाबत एकमत झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी केला. येत्या चार ते पाच दिवसांत उर्वरित जागांचा निर्णय होणार असून त्यासाठी आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या संसदीय समिती आणि छाननी समितीची बैठक पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह, पक्षाचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक, दिलीप वळसे-पाटील, फौजिया खान आणि महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची बैठकीत उपस्थिती होती. बैठकीनंतर जयंत पाटील आणि नबाव मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आघाडीतील जागा वाटप, पक्षांतर, राज्य सहकारी बँक घोटाळा आणि वंचित बहुजन आघाडीबाबत त्यांनी भाष्य केले.

पक्षाकडे ८१३ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. या अर्जावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ज्या ठिकाणी एक किंवा दोन इच्छुक आहेत, त्या जागांबाबत कोणतीही अडचण नाही. काँग्रेसबरोबरच्या आघाडीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. २२० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांबाबत येत्या चार ते पाच दिवसांत बैठक होणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्यामध्ये अजित पवार यांचे नाव घेण्यात येत आहे. मात्र इतरांची नावे घेतली जात नाहीत. ते सर्व भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत, असा आरोप पाटील यांनी केला.

पाटील म्हणाले,की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारतीय जनता पक्षात का जात आहेत, हे सर्वानाच माहिती आहे. नेते गेले तरी पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. जे पक्ष सोडून जाणार नाहीत, अशा नेत्यांची नावेही पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेत घेतली जात आहेत.

भुजबळांची उपस्थिती, उदयनराजेंची अनुपस्थिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे बैठकीला उपस्थित राहिले. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर भुजबळ यांनी या बैठकीला उपस्थित राहात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच ते राहणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. उदयनराजे भोसले पक्ष सोडणार असल्याचे बोलले जात आहे. जयंत पाटील यांनी मात्र ते राष्ट्रवादीतच असल्याचे सांगितले. विजयसिंह मोहिते पाटील यांनीही अद्याप आपल्याकडे राजीनामा दिला नसून एखाद्या व्यासपीठावर जाण्याने त्यांची निष्ठा बदलली का हे सांगता येणार नाही, असे पाटील म्हणाले.