वाह रे शासन तेरा खेल, न्याय मांगे तो हो गयी जेल- छगन भुजबळ

0
1065

रत्नागिरी, दि. ११ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या अटकेबाबत सांगताना सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. “वाह रे शासन तेरा खेल, न्याय मांगे तो हो गयी जेल,” असे शालजोडे त्यांनी दिले. “तसेच अडीच वर्ष ठेवले मला आतमध्ये. मला का पकडले ते मलाही माहित नाही, ज्यांनी पकडले त्यांनाही माहीत नाही,” असे म्हणत भुजबळ यांनी सरकारची खिल्ली उडवली. राष्ट्रवादीच्या ‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रेनिमित्त गुहागर इथे भुजबळ बोलत होते.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. भुजबळ दोनपेक्षा जास्त वर्ष तुरुंगात होते. १४ मार्च २०१६ रोजी त्यांना अटक केली होती. तर ४ मे २०१८ रोजी भुजबळांना अखेर जामीन देण्यात आला.

याविषयी छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र सदनामध्ये २५ हजार कोटी खाल्ले असे बोलतात. २५ हजार कोटी? मग म्हणाले १० हजार कोटी खाल्ले, आता फक्त ८५० कोटी, अरे १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट होते. विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ठरवले की या माणसाकडून हे काम करुन घ्या १०० कोटींचे. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून माझे काम होते की, ते चांगले बनवून घ्यायचे आणि दिल्लीत नाव गाजवायचे.

“पण मलाच कळले नाही, ज्या ८५० कोटींचा माझ्यावर ठपका लावला, तसेच ज्याने ते बनवले तो बिचारा कोकणात जाऊन बसलाय, त्याला एक रुपया दिला नाही. ज्याने एवढी सुंदर इमारत बांधली, त्याला एक रुपया सुद्धा दिला नाही, तो माणूस मला ८५० कोटी रुपये कसा देईल? पाच फुटांची गाय गाभण राहिली आणि बाळंत झाली तर तिला १५ फुटांचे रेडकू होईल का? १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देता आणि ८५० कोटी खर्च होतात?”, असे छगन भुजबळ म्हणाले.