वायसीएम मध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त देणार

0
269

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – भाजप नगरसेवकाने केलेली दमदाटी, धक्काबुक्कीचा निषेध म्हणून महापालिकेच्या डॉक्टरांनी आंदोलन केले. त्याची तत्काळ दखल घेत या विषयावर चर्चा करण्यात आली आणि वायसीएम मध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची ठरले.

सद्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये २६ जुलै रोजी रात्री यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये एका नगरसेवकाने डॉक्टर कर्मचाऱ्यांना रुग्णसेवेवरुन शिवीगाळ केली. या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी आज सकाळी रुग्णसेवा सोडून काम बंद केले. रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु केले होते. या संदर्भात आमदार महेशदादा लांडगे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी तातडीने वायसीएम रुग्णालयास समक्ष भेट देवुन येथील आंदोलनकर्त्या डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तात्काळ पोलीस बंदोबस्त लावणार असल्याचे सांगून निवासी डॉक्टरांच्या समस्या त्वरीत मार्गी लागण्यासाठी आयुक्तांसोबत बैठक घेवुन सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. अशा प्रकारे कोणत्याही पक्षाचा नगरसेवक वा पदाधिकारी असो त्यांचे कडुन रुग्णालयामध्ये कोणताही गैरप्रकार घडल्यास त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. यानंतर डॉक्टरांनी समाधान व्यक्त करुन आंदोलन मागे घेत कामास सुरुवात केली.

दरम्यान डॉक्टरांच्या प्रश्नासंदर्भात मा. महापौर, पदाधिकारी व आयुक्त श्रावण हर्डीकर व अधिकारी यांच्या समवेत आज दु. ४ वा. तातडीने वायसीएम रुग्णालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रुग्णालयाच्या गेटवर पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचे तसेच डॉक्टरांच्या रात्रीचे वेळी अचानक उद्भवनाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एका जबाबदार वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. उपस्थित डॉक्टरांनी मानधन वाढी बाबत मुद्दा उपस्थित केला होता त्यानुषंगाने वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे मानधन ६५ हजारावरुन ७५ हजार व कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे मानधन ५५ हजारावरुन ६५ हजार इतकी वाढ केली असल्याचे स्पष्ट केले. तसेच नगरसेवक व पदाधिकारी यांचे रुग्णासंदर्भातील समस्याचे निराकरण करणेसाठी वायसीएम रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करणेत येणार आहे. त्याचबरोबर वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांची माहिती दर्शविणारा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सुचना देण्यात आल्या. सद्या सर्वच रुग्णांलयावर कामाचा ताण असताना देखिल रुग्णालयातील नर्सेसच्या सर्वेक्षणासाठी नेमणूका केलेल्या आहेत. त्यांच्या ऐवजी आशा वर्करला प्रशिक्षित करुन या सर्वेक्षणाच्या कामासाठी त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे व उपलब्ध होणाऱ्या नर्सेसच्या नेमणूका रुग्णालयामधील अतिदक्षता विभागामध्ये करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता बालनगरी व ऑटो क्लस्टर येथे जम्बो रुग्णालय तयार करण्यात येत असुन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन व आयसीयु बेड ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याबाबतचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

एखाद्या रुग्णांस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचे कुटुंबिय किंवा सख्खे नातेवाईकसुध्दा रुग्णाजवळ येत नाहीत. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर आपल्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णालयात उपस्थित राहुन रुग्णसेवा करीत आहेत. त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करुन त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. असे असताना काल घडलेला प्रकार निंदणीय असुन याबाबत दोन्ही आमदारांनी डॉक्टरांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच दखल घेतली जाईल असे आश्वासित केले.