वाकड येथे भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीसांना जबर मारहाण; एक गंभीर

0
1859

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – सार्वजनिक शौचालयात महिलेबाबत अश्लिल शब्द लिहून बदनामी केल्या प्रकरणी दोन गटात वाद सुरु होता. यादरम्यान दोन गटात वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तिघा पोलिसांना काठीने जबर मारहाण करुन गंभीर जखमी करण्यात आले. हा प्रकार आज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्यासमोर घडला.

या धक्कादायक घटनेत वाकड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रमोद भांडवलकर जगदाळे आणि गंभिरे तिघेही गंभीर जखमी झाले. सध्या भांडवलकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, साजन सुभाष सुकळे (वय १९), सुभाष रामा सुकळे  (वय ४०), लहू बापू सुकळे (वय २३), अनिल अण्णा सुकळे (वय २२), शिवाजी बापू सुकळे (वय ३०, सर्व रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील म्हातोबानगर झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालयात एका महिलेबद्दल अश्लिल शब्द लिहण्यात आले होते. यासाठी आज संशयीत आणि पिडित महिलेच्या घरच्यांमध्ये वाद सुरु होता. यावेळी संशयीत आणि पिडितेच्या कुटूंबात बाचाबाची होऊन भांडणे सुरु झाली. यावर पोलीस हवालदार कुदळ आणि भांडवलकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मध्यस्ती करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावर पुरुषांसहित काहि महिलांनी पोलिसांवरच हल्ला चडवला. या घटनेत भांडवलकर यांना काठीने जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये त्यांना फॅक्चर देखील झाले असल्याचे समजते. तर इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आले असता त्यांनाही धक्काबुकी करण्यात आली. याप्रकरणी पोलीसांनी एकूण २१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर पाचजणांना अटक केली आहे.