वांद्रे स्थानकाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या – खासदार पूनम महाजन

0
885

मुंबई, दि.२ (पीसीबी) – वांद्रे टर्मिनस स्थानकाचे नाव बदलून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे टर्मिनस असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी केली आहे. पूनम महाजन यांनी या संदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आहे. तसेच महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाही याबाबत पत्र लिहले आहे. २०१७ मध्ये सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना पूनम महाजन यांनी नामकरणाबाबतचा प्रस्ताव त्यांच्याकडे आणि राज्य सरकारकडे पाठवला होता.

बाळासाहेब ठाकरे यांचे वांद्र्यात दीर्घकाळ वास्तव्य होते त्यामुळे वांद्रे स्थानकाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पूनम महाजन यांनी केली आहे. या मागणीमध्ये कोणतेही राजकारण नसल्याचा खुलासाही महाजन यांनी केला आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दखल घेतली असून राज्य सरकारकडून प्रस्ताव मागवून घेत त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे पूनम महाजन यांनी सांगितले.

दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर पूनम महाजन यांनी जाणूनबुजून ही मागणी केल्याचे काही जणांचे म्हणने आहे. महाजन यांनी ज्यावेळी पियुष गोयल यांची यासंदर्भात भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी हा प्रस्ताववर राज्य सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी घेण्याची सुचना केली होती. त्यानंतर महाजन यांनी देवेंद्र फडणवीस आणि राजनाथ सिंह यांना पत्र लिहून परवाणगी मागितली आहे.