वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हिंजवडी आयटी कंपनीतील संगणक अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

0
697

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – हिंजवडी येथील एका नामवंत आयटी कंपनीतील वरिष्ठांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका संगणक अभियंत्याने सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.१०) रात्री साडेआठच्या सुमारास चतुःश्रृंगी येथे घडली.

चेतन वसंतराव जायले (वय २६, रा. बालाजी हौसिंग सोसायटी, बालेवाडी फाटा) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ कुंदन जायले (वय 29, रा. ठाकुर्ली ईस्ट, मुंबई) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, चेतन याने मृत्युपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरुन रवि आठला आणि महेश खडके या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन मागील साडेचार वर्षांपासून हिंजवडीतील एका आयटी कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत होता. मात्र त्यास रवि आणि महेश हे दोघे त्रास देत होते. यामुळे कंटाळलेल्या चेतनने बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास चतुःश्रृंगी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी चेतनने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्याच्या कामातील वरिष्ठ अधिकारी रवि आणि महेश या दोघांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हणले आहे. याप्रकरणी या दोघांवर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.एस.शिंदे तपास करत आहेत.