लोकसभेला शिवसेना खासदार बारणेंचे काम करणार नाही; भाजप नगरसेवकांचे नितीन गडकरींना निवेदन    

0
3659

पिंपरी, दि १० (पीसीबी) – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या पाच वर्षात भाजप सरकारवर आणि त्यांच्या निर्णयावर सातत्याने टीका केली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून बारणे यांना निवडून आणले. कोणतीही अपेक्षा न ठेवता बारणे यांचे काम केले. परंतु निवडून आल्यानंतर बारणे यांनी त्याची जाणीव ठेवली नाही.  त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारणे शिवसेनेचे उमेदवार असल्यास आणि युती झाल्यास तर त्यांचे काम करणार नाही, अशी ठाम भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतली आहे.

याबाबत आज (रविवार) पिंपरी दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पिंपरी महापालिका सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर शैलजा मोरे, नगरसेवक नामदेव ढाके, शितल शिंदे, नगरसेविका शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे यांनी निवेदन दिले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून  शिवसेनेसोबत युती करण्याच्या हालचाली सुरु आहेत. शिवसेनेसोबत युती करण्यास पिंपरी चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांची काहीही हरकत नाही. परंतु मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या पाच वर्षात भाजप सरकारवर आणि त्यांच्या निर्णयावर सातत्याने टीका केली आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. कोणतीही अपेक्षा न ठेवता बारणे यांचे काम केले. परंतु निवडून आल्यानंतर बारणे यांनी त्याची जाणीव ठेवली नाही.

स्थानिक पातळीवर बारणे यांना भाजपचा कोणताही राजकीय त्रास नव्हता. तरीही त्यांनी भाजपच्या केन्द्रीय नेतृत्वावर टीका आणि आरोप केले आहेत. त्याचा पिंपरी चिंचवडमधील जनतेने महापालिका निवडणुकीत बदला घेतला. बारणे यांचे चार नगरसेवक सुद्धा जनतेने निवडून दिले नाहीत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही.

आगामी लोकसभा निवडणुकीत युती झाली आणि मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला, तसेच शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली. तर आम्ही बारणे यांचे काम करणार नाही, हे आम्ही ठामपणे आपणाला आणि पक्षाला सांगत आहोत. श्रीरंग बारणे हे मावळमध्ये युतीचे उमेदवार असतील, तर आम्ही आमचा निर्णय घेण्यास समर्थ आहोत, याची पक्षाने दखल घ्यावी. पक्षाने आमच्यावर करवाई केली तरी बेहत्तर पण आम्ही श्रीरंग बारणे यांचे काम करणार नाही, याची आपण आताच नोंद घ्यावी, असा आक्रमक पवित्रा या नगरसेवकांनी घेतला.

दरम्यान, बारणेविरोधी भाजप नगरसेवकांच्या भूमिकेमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश आहे. या ठिकाणी भाजपच्या प्राबल्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे येथील भाजपची ताकद निर्णायक ठरणार आहे. भाजपच्या मदतीशिवाय शिवसेनेला लढत देण्यास मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. भाजप नगरसेवकांनी काम करण्यास कडाडून विरोध केल्याने खासदार बारणे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग खडतर असेल.