लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील १४ जागांसाठी मतदानाला सुरूवात

0
624

पुणे, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील १४ जागांवर आज ( मंगळवार)  मतदान होत आहे. यामध्ये पुणे, बारामतीसह माढा, सातारा, सांगली ,कोल्हापूर, हातकणंगले, नगर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, जळगाव, रावेर, औरंगाबाद व जालना येथे मतदान होत आहे. 

आजच्या तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, नगरमधून विखेपुत्र डॉ. सुजय विखे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सांगलीत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत आहेत. माढ्यात रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि संजय शिंदे यांच्यातही चुरस आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या  रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये काय होते हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

कोल्हापुरातील काँग्रेस आघाडीचे धनंजय महाडिक आणि युतीचे संजय मंडलिक तर हातकणंगल्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि युतीचे धैर्यशील माने यांच्यात लढत असेल. मराठवाड्यात औरंगाबाद, जालन्यात मतदान होत असून, खासदार चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे यांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे.