बारामतीत भाजपचा विजय झाल्यास आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ – अजित पवार

0
754

बारामती, दि. २३ (पीसीबी) – भाजपने बारामतीची जागा प्रतिष्ठेची केली असून राष्ट्रवादीकडून ही जागा हिसकावून घेण्यासाठी भाजपने चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. भाजप नेते यंदा बारामतीत इतिहास घडणार असल्याची वल्गना करत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला आव्हान दिले आहे. बारामतीत भाजपचा विजय झाल्यास आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ,  असे त्यांनी म्हटले आहे.

बारामतीच्या काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केल्यानंतर अजित पवार आज (मंगळवार)  पत्रकारांशी बोलत होते.  बारामती भाजपने जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन पण भाजपला बारामती जिंकता आली नाही, तर त्यांनी निवृत्ती घ्यावी,  असे आव्हानही अजित पवारांनी यावेळी केले आहे.

पवार म्हणाले की, बारामतीचा गड १०० टक्के राखणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. खासदार  सुप्रिया सुळे  मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,  असा विश्वास  पवार यांनी  व्यक्त केला.  दरम्यान, बारामतीमधून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात  आहेत. त्यांच्या समोर भाजपच्या कांचन कुल यांनी मोठे  आव्हान उभे केले आहे.  भाजपने या मतदारसंघात मोठी ताकद लावली आहे. त्यामुळे  येथे रंगतदार लढत होत आहे.