लोकसभा लढवणार नाही, तर विधानसभेचे ठरवलेले नाही – एकनाथ खडसे     

0
801

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – मला घाणेरड्या राजकारणाचा वीट आला आहे. त्यामुळेच मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करून विधानसभा लढवण्याबाबत अजून ठरवलेले नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. भाजपमध्ये होत असलेल्या खदखद खडसे यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात कशा निवडून येतील,  याकडे आमचे लक्ष आहे, असे ते म्हणाले.  लोकसभेसाठी मी इच्छुक नाही, मात्र  पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. विधानसभा निवडणुकांना अवधी आहे. त्या  जवळ आल्यावर त्या लढवायच्या की नाही, याबाबत ठरवले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, खडसे यांनी आपल्यावरील अन्यायाविरोधात जाहीर सभांमधून अनेकवेळा वाच्यता केली आहे. भाजप पक्षात त्यांची होत असलेली घुसमट त्यांनी वेळीवेळी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर खडसे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफरही देण्यात आली होती. मात्र, खडसे यांनी अत्यंत कौशल्याने भाजपमधून बाहेर पडण्याच्या चर्चांना बगल दिली आहे.