लोकसभा निकालापूर्वीच सपा-बसपा कार्यकर्त्यांमध्ये ‘रक्तपात’; योगींचा दावा

0
575

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीमध्ये सौहार्दाचे वातावरण दिसत असले तरी ते निकालाच्या दिवसापर्यंत टिकणार नाही. २३ मे ला निकाल आहे. त्याआधीच ही आघाडी तुटेल. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते परस्परांवर हल्ले करतील असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. या संभाव्य हिंसाचाराचा सामना करण्यासाठी आपले प्रशासन तयारी करत आहे असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी  ते बोलत होते.

गोरखपूरमध्ये झालेल्या सभेत अखिलेश आणि मायावती यांनी तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार करुन मठामध्ये पाठवेपर्यं शांत बसणार नाही असे जाहीर केले आहे. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना योगी म्हणाले की, २३ मे निकालाच्या आधीच या आघाडीमध्ये स्फोट होईल.

सपा आणि बसपाचे कार्यकर्ते परस्परांच्या रक्तासाठी आसुसलेले असतील. थोडे थांबा आणि पाहा बुआ-बबुआ कसे परस्परांवर शाब्दीक हल्ले चढवतात. रक्तपात रोखण्यासाठी मला प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्या लागल्या आहेत असे योगी म्हणाले.