लोकसभा उमेदवारीविरोधातील याचिका फेटाळली ; साध्वी प्रज्ञासिंहना दिलासा

0
514

मुंबई, दि. २४ (पीसीबी) –  मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर  यांना निवडणूक लढण्यास परवानगी  देण्यात येऊ नये, अशी मागणी करणारी याचिका एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे.  याबाबतचा चेंडू न्यायालयाने  निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलवला आहे.  यामुळे साध्वींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

साध्वीला भाजपने भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. तिच्या उमेदवारीवरून वादंग सुरू झाले आहे. मालेगाव स्फोटात मरण पावलेल्या एका मुलाच्या कुटुंबीयांनी  न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात साध्वीला निवडणूक लढविण्यास परवानगी देण्यात येऊ नये, व तिचा जामीन रद्द करावा, अशी मागणी   करण्यात आली होती.  त्या याचिकेवर  सुनावणी  झाली.

याचिकाकर्त्यांची ही मागणी कायद्याला धरून नसल्याचा युक्तिवाद साध्वीच्या वतीने करण्यात आला. तर, आम्ही साध्वीला ‘क्लीन चिट’ दिलेली आहे,  असे एनआयएने  स्पष्ट केले होते. एखाद्या आरोपीला निवडणूक लढण्यापासून रोखणे, हा निर्णय न्यायालयाच्या अखत्यारीत नाही.  याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानेच घ्यावा, असे न्यायमूर्ती विनोद पडाळकर यांनी म्हटले आहे.