लॉकडाऊन काळात कामगारांना दुचाकीची परवानगी

0
362

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – लॉकडाऊन काळात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व कारखाने सुरू राहणार आहेत. कामगारांना कंपनीत ये-जा करण्यासाठी दुचाकी वापरता येणार आहे, पण त्यासाठी कंपनीच्या लेटरहेटवरचा परवाना आणि ओळखपत्र गरजेचा आहे. मात्र, ज्या कंपनीत कामगार कोरोना बाधित आढळला तर त्या कंपनीतील सर्व कामगार आणि अधिकारी यांची कोरोना तपासणी कऱण्याची जबाबदारी संबंधीत कंपनी व्यवस्थापनाची असणार आहे तसेच त्या कालावधीत कंपनी बंद करण्याचे बंधन असेल. महापालिकेने दुपारी सुधारीत परिपत्रक काढले आहे. महापालिकेने सुरवातीला दिलेल्या परिपत्रकात चारचाकी वाहन अथवा निश्चित केलेल्या बसमधूनच कामगारांना कंपनीत येण्याची परवानगी होती. त्यात बदल करत दुचाकीची ही मुभा देण्यात आली आहे

पिंपरी चिंचवडच्या लॉकडाऊनमध्ये उद्योग आणि आयटी कंपन्या सुरुच राहणार हे आता निश्चित झालंय. महापालिकेने तसं परिपत्रकात नमूद केलंय. पण कर्मचाऱ्यांना कंपनीत आणण्यासाठी औद्योगिक कंपन्यांना चारचाकी वाहन अथवा निश्चित केलेल्या बसचीच परवानगी राहील. तर जी कंपनी कर्मचाऱ्यांची कंपनीतच राहण्याची सोय करेल त्यांना कोणतीही अडचण नसेल. पण प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला ओळखपत्र बाळगणं बंधनकारक असेल. तसेच कंपनीत कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांच्या चाचण्या कंपनीला स्व-खर्चातून कराव्या लागणार आहेत. तसेच उद्योग बंद ही ठेवावा लागणार आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योग अर्थात आयटी कंपन्या 15 टक्के क्षमतेने सुरू राहतील. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात यावी. अशा सूचना देण्यात आल्यात. यातील काही अटी जाचक असल्याने लघुउद्योजकांनी त्यास तीव्र विरोध केला होता. यात आता सुधारणा केल्या आहेत.