लाच प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षकवर गुन्हा

0
402

पिंपरी, दि. 2 (पीसीबी): बलात्काराचा गुन्हा दाखल करु नये यासाठी लाच घेणाऱ्या फौजदाराला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत रंगेहात पकडले. लाच प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक आणि एक सहाय्यक फौजदार अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर आले आहेत. दरम्यान, अ‍ॅन्टी करप्शनच्या कारवाईमुळं पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात प्रचंड खळबळ उडाली आहे. सांगवी पोलिस ठाण्याच्या परिसरातच ‘ट्रॅप’ यशस्वी झाल्यानं पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

महिला पोलिस उपनिरीक्षक हेमा सोळुंके असे अ‍ॅन्टी करप्शनच्या रडारवर आलेल्या महिला अधिकार्‍याचं नाव आहे. दरम्यान सहाय्यक फौजदार अशोक देसाई यांनी गुंगारा दिल्याचं समजतं. याबाबत अ‍ॅन्टी करप्शनचे उपाधिक्षक श्रीहरी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, सहाय्यक फौजदार फरार झाल्याचं त्यांनी सांगितलं. केलेल्या तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये महिला उपनिरीक्षक हेमा सोळुंखे आणि सहाय्यक फौजदार अशोक देसाई हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने आज सायंकाळी सांगवी पोलिस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. पंचासमक्ष लाच घेताना संबंधित महिला उपनिरीक्षक वर कारवाई करण्यात आली आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात सापडल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

आरोपी :- १) लोकसेवक- श्रीमती हेमा सिध्दराम सोळुंके, वय- २८ वर्ष,महिला पोलीस उपनिरीक्षक , २) अशोक बाळकृष्‍ण देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, दोन्ही नेमणूक- सांगवी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय]