लाच घेतल्याप्रकरणी भाजप आमदार योगेश टिळेकरांविरोधात एसीबीकडे तक्रार

0
3015

पुणे, दि. १७ (पीसीबी) – बांधकाम व्यावसायिकाला लाभ मिळवून देण्यासाठी हडपसरचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी १ कोटी ४ लाखांची आलिशान गाडी लाच स्वरुपात घेतली, असा   आरोप पुणे महापालिकेतील मनसेचे गट नेते वसंत मोरे यांनी केला आहे. याप्रकरणी मोरे यांनी आमदार टिळेकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

बांधकाम व्यावसायिकाला लाभ व्हावा, यासाठी आमदार टिळेकर यांनी आपल्या आमदारकीचा गैरफायदा घेत सेक्टर नं. ३६, ३७ आणि ३८ या जागेवरील आरक्षण बदलले आहे, असे मोरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच टिळेकर यांनी आलिशान मर्सडिज गाडी खरेदी करताना आपला उत्पन्नचा स्त्रोत लपविला आहे. तसेच आयकर विभाग व इतर कर विभागांची दिशाभूल करण्यासाठी गाडी आपल्या नावावर केलेली नाही. गाडी बांधकाम व्यावसायिक संजीव त्यागी यांच्या नावावर घेतली आहे.

संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवरील हिलटॉप व रस्त्याचे आरक्षण बदलून ते रहिवाशी करण्यात आले आहे. त्याबदल्यात व्यावसायिकाला ५० कोटींचा लाभ होणार आहे. त्यामुळे त्या व्यावसायिकाने टिळेकर यांना गाडी भेट दिली आहे, असे  मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.