लाख लोकांचे स्थलांतर, पुणे महापालिकेचा निर्णय

0
857

पुणे, दि.२८ (पीसीबी) – ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेने महत्त्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. पाच क्षेत्रीय कार्यालयातील हॉटस्पॉटमधील गर्दी कमी करण्यावर पालिकेचा भर आहे. यासाठी किमान 20 हजार कुटुंबांचं ( एक लाख नागरिक) तात्पुरते स्थलांतर केलं जाणार आहे. ‘कोरोना’चे केंद्रस्थान असलेल्या भवानी पेठेतील रुग्णसंख्या तब्बल 250 वर गेली आहे.

पुणे जिल्ह्यात काल 84 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 1,348 वर पोहोचली आहे. भवानी पेठ, शिवाजीनगर घोलेरोड, कसबा पेठ विश्रामबाग वाडा, ढोले पाटील रोड आणि येरवडा धानोरी या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पाच क्षेत्रीय कार्यालयात रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या भागात जवळपास 72 हजार कुटुंब राहत असून त्यांची लोकसंख्या तब्बल साडेतीन लाखांच्या घरात आहे. त्यामुळे इथल्या किमान 20 हजार कुटुंबांना तात्पुरतं हलवलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात साधारण एक लाखापर्यंत नागरिकांना स्थलांतरित केलं जाणार आहे. यानंतर गरज पडल्यास आणखी कुटुंबांना हलवलं जाण्याची शक्यता आहे. एक आड एक घरातील रहिवाशांना किंवा एका घरातील काही सदस्यांना स्थलांतरित करण्याचं नियोजन आहे. या नागरिकांची शाळा, मंगल कार्यालय, एसआरए इमारत, वसतिगृहात तात्पुरती सोय केली जाणार आहे. इथे स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा आणि सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत.

पुणे शहरात काल दिवसभरात 72 नवे रुग्ण सापडले असून तिघांचा कोरोनाने 3 बळी घेतला आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनाचे 75 बळी गेले असून 966 रुग्ण उपचार घेत आहेत. पुणे शहरात 27 एप्रिलपर्यंत 1222 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी 1183 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. भवानी पेठेसह शिवाजीनगर घोलेरोड, कसबा पेठ विश्रामबाग वाडा, ढोले पाटील रोड आणि येरवडा धानोरी या पाच वॉर्डमध्ये रुग्णसंख्या शंभरीपार गेली आहे. ढोले पाटील रोड (21 नवे रुग्ण) , शिवाजीनगर – घोलेरोड (15), येरवडा – धानोरी (12), हडपसर – मुंढवा (9) या भागात कालच्या दिवसातही मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण सापडले आहेत.