खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला; परीक्षा, लॉकडाऊन, उद्धव ठाकरे यांसारख्या विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केलं

0
305

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. परंतु देशव्यापी लॉकडाऊनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच 10 मे पर्यंत राज्यातील परीक्षांचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपलं मत मांडलं.

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बोनस वेळ मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरुच ठेवावा. येत्या 10 मेपर्यंत परीक्षांबाबत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी या विषयावर चर्चा झाली. ते यावर काम करत आहेत आणि लवकरच चित्र स्पष्ट होईल,” असं खासदार सुळे यांनी सांगितलं.

महाराष्ट्र उद्धव ठाकरेंकडे मोठा भाऊ म्हणून पाहतोय. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. यासाठी संपूर्ण यंत्रणा हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. फेसबुकवर संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या की, “आज उद्धव ठाकरेंकडे राज्यातील जनता मोठा भाऊ म्हणून पाहतेय, याचा आनंद आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री चांगलं काम करत आहेत.” तसंच महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
लॉकडाऊन शिथिल करण्याचा सरकारचा विचार
लॉकडाऊन शिथिल होण्याची मीही तुमच्याप्रमाणेच वाट पाहत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवाय केंद्र सरकारही लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु लॉकडाऊन घाईगडबडीत उठवून चालणार नाही, ते टप्प्याटप्प्याने उठवलं पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनलॉकिंग हळूहळू सुरु झालं पाहिजे असं मत व्यक्त करताना लोकांना काम हवं असल्याचंही त्या म्हणाल्या.

पर्यावरणाबाबत आपल्याला अधिक संवेदनशील राहावं लागेल. आपण आपल्या पातळीवर पर्यावरणासाठी योगदान द्यायला हवं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. टीबीमुळे राज्यात महिन्याला एक लाख लोक दगावतात. त्यामुळे खबरदारी घ्यायला हवी. यासाठी रस्त्यावर न थुंकण्याचे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं. तसंच यासंदर्भात खासदार अमोल कोल्हे यांच्याबरोबर एक कॅम्पेन करणार असल्याचं सांगत जनतेनेही अशी मोहीम सुरु करण्याचं आवाहन त्यांनी केलं.