सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचं निधन – सोलापूर येथे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

0
373

सोलापूर, दि. २८ (पीसीबी) – आपल्या ओघवत्या रसाळ वाणीने महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गाला मार्गदर्शन करणाऱ्या सोलापुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, निराधार महिलांचा आधार बनलेल्या अपर्णा अरूण रामतीर्थकर (वय ६५) यांचे अर्धांगवायुच्या आजाराने मंगळवारी पावणे बारा वाजता सोलापुरात निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, मुलगा आशुतोष, सून रश्मी आणि नातू असा परिवार आहे.

मूळच्या पुण्याच्या असलेल्या अपर्णा रामतीर्थकर सोलापुरात आपले दिवंगत पती तथा ज्येष्ठ पत्रकार अरूण रामतीर्थकर यांच्याबरोबर आल्या आणि सोलापूरकर झाल्या.महिलांना कायदा विषयक मार्गदर्शन, महिलांचे हक्क, जबाबदाऱ्या यावर त्यांची हजारो व्याख्याने झाली. असंख्य महिलांना त्यांनी न्याय मिळवून दिला. वकिली पेशा असताना वकिली करताना अनेेक गोष्टी खटकल्याने त्यांनी सरळ सामाजिक कार्याचा वसा घेतला. त्या उत्तम हौशी नाट्य कलावंत होत्या. हिंदुत्व विचारसरणीचा पगडा असलेल्या अपर्णा रामतीर्थकर यांनी सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदाऱ्या’ यासारख्या विषयांवर तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली होती. तुटणारी घरे वाचविली पाहिजेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘पाखर संकुल’, ‘उद्योगवर्धिनी’ आदी संस्थांशी त्यांचा संबंध होता. अलिकडे संभाजी प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि इंदुरीकर महाराजांच्या विधानांवरून राज्यात वाद उफाळला असता त्यांचे समर्थन करताना अपर्णा रामतीर्थकर यांच्यावरही टीका करण्यात आली होती. विशेषतः मुलींचे शिक्षण, त्यांचं घराबाहेर फिरणे, पोशाख आदी मुद्यांवर केलेल्या विधानांवरूनही अपर्णा रामतीर्थकर टीकेच्या धनी झाल्या होत्या. त्यांना सामाजिक कार्याबद्दल काही पुरस्कारही मिळाले आहेत.