‘लाखो रुपयांचे हप्ते घेणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे अवैध बांधकामांचा सुळसुळाट’

0
620

– उच्च न्यायालयाचे आदेश असल्याचे सांगून महापालिका व प्राधिकरण प्रशासनाची कारवाईला टाळाटाळ

पिंपरी, दि.२५ (पीसीबी) – कोरोनाच्या परिस्थितीत एकाही अवैध बांधकामावर कारवाई अथवा नोटीस देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केल्याने त्या आदेशाचा गैरफायदा घेत पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र अवैध बांधकामांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. अधिकृत बांधकाम असलेल्यांनीही वाढीव अवैध बांधकामे सुरू केल्याने गल्लीबोळात बांधकामे सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळले. ही परिस्थिती नियंत्रीत करण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते महापालिका आणि प्राधिकरण प्रशासनातील संबंधीत अधिकारी हप्ते घेऊन डोळेझाक करत आहेत. त्यातच आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने कारवाई होणार नाही, हे लक्षात आल्याने रोज हजारो अवैध बांधकामांची भर पडते आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात गेले आठ महिन्यांपासून ही परिस्थिती कायम असल्याने शहराचे बकालीकरण सुरू असल्याचे कायदा पाळणारे नागरिक सांगतात.

कोरोनाच्या काळात नागरिकांची परवड होऊ नये, त्यांना बेघर व्हायला लागले तर परिस्थिती बिकट होईल म्हणून या काळापुरती कुठेही कारवाई नको, असे स्पष्ठ आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. लॉकडाऊन काळातील या आदेशाला दोन वेळा मुदत वाढ मिळाली आहे. महापालिका आणि प्राधिकरणातील संबंधीत प्रशासन अधिकारी या विषयावर विचारणा केली असता न्यायालयाच्या आदेशाकडे बोट दाखवतात. परिणामी अशा बांधकामांना अभय मिळते आहे. महापालिकेचे बिट निरीक्षक या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष करण्यासाठी रोज लाखो रुपयेंचा हप्ता गोळा करत आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांच्याकडे असंख्य तक्रारी गेल्या आहेत, पण त्यानंतरही पुढे कारवाई दिसत नाही.

प्राधिकरणाच्या हद्दीत से. २१ मध्ये निगडी साईनाथनगरमध्ये भर चौकात व्यापारी गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे. त्याच्या लगत एका तीन मजली इमारतीवर आणखी दोन मजल्यांचे बांधकाम राजरोसपणे होताना दिसते. से. २२ पूर्णतः रेडझोन मध्ये असताना मेन रोडच्या कडेला मोकळ्या जागांवर पत्राशेडची गोदामे, भंगारमालाची दुकाने उभारण्याचे काम दिसते. जिथे मोकळी जागा असेल तिथे बेधडक टपरी अथवा बांधकाम करून इमारती उभ्या राहत असल्याचे फेरफटक्यात दिसले. अशाच पध्दतीने जवळच रुपीनगर-तळवडे या महापालिका कार्यक्षेत्रात शेकडोने अवैध बांधकामे होताना दिसली.

प्राधिकरणाच्याच से. ३१-३२ मध्ये आकुर्डी गुरुद्वाराजवळच्या बहुतेक सर्वच गल्लीबोळांतून इमारतींवर दोन-तीन मजले वाढविण्याचे काम पहायला मिळाले. प्राधिकरण संपादित मोकळ्या भूखंडावरही १२ ते १६ फ्लॅटची स्किम सुरू असल्याचे दिसले. चिंचवड वाल्हेकरवाडी रस्त्यावर भर रस्त्यालगत दुमजली इमारतीवर आणखी दोन मजले बांधकाम होते आहे. चिंचवडेनगर येथील सुरू असलेल्या अवैध बांधकामे आणि गोदामांची पुराव्यांसह तक्रार करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नसल्याचे स्थानिक कार्यकर्त्याने सांगितले.

आकुर्डी रेल विहार सोसायटी मागील कॉलनीत एका तीन मजली इमारतीवर आणखी दोन मजले बांधकाम सुरू आहे. रावेतला महापालिका क्षेत्रात भोंडवे चौकात दुकानांचे गाळे बांधून विकण्याचा मोठा धंदा काही बिल्डर्स आणि दलालांनी सुरू केला आहे. अशाच पध्दतीने भोसरी-आळंदी रस्त्यावर रेडझोन हददीत, चिखली-मोशी रस्ता, मोशी-आळंदी रस्त्यालगत, चऱहोली रस्त्याच्या दुतर्फा, वडमुखवाडी, चोवीसावाडी, दगडी खाण रस्त्यालगत अवैध बांधकामांची रेलचेल आहे. महापालिकेचे बिट निरीक्षक हप्ता घेऊन दुर्लक्ष करतात, असे सांगण्यात आले.