शिरगाव पोलिसांचा तीन दारुभट्ट्यांवर छापा; ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल नष्ट

0
217

शिरगाव, दि.२५ (पीसीबी) – शिरगाव पोलिसांनी अवैधरित्या सुरु असलेल्या तीन दारूभट्ट्यांवर छापा मारला आहे. दोन दिवसात शिरगाव पोलिसांनी तीन दारूभट्ट्यांवर छापे मारून सात लाखांहून अधिक मुद्देमालाची विल्हेवाट लावली आहे.

शिरगाव चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव पोलिसांनी सोमवारी (दि. 23) ओझर्डे गावात सुरू असलेल्या एका अवैधरित्या सुरू असलेल्या दारुभट्टीवर छापा मारला. त्यात पोलिसांनी चार हजार लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन नष्ट केले.

त्यानंतर मंगळवारी (दि. 24) सांगवडे गावात पवना नदीच्या किनारी अवैधरित्या एक दारुभट्टी सुरू असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारुभट्टीवर छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी अडीच लाखांचे 25 हजार लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन जप्त करून त्याची विल्हेवाट लावली.

मंगळवारी दुपारी शिरगाव पोलिसांनी शिरगाव गावात सुरु असलेल्या आणखी एका भट्टीवर छापा मारला. त्यात पोलिसांनी साडेचार लाख रुपयांचे नऊ हजार लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन नष्ट केले.