लढण्याआधीच पडले; लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘या’ पक्ष्याच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

0
598

लातूर, दि. 2३ (पीसीबी): लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांचे सर्वच अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. काँग्रेस प्रणित पॅनलच्या दबावाखाली हे अर्ज बाद करण्यात आले आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी भाजपने थेट राज्यपालांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
लातूर जिल्हा बँकेत 19 संचालकांच्या पदासाठी ही निवडणूक होते आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. हे सर्व अर्ज काही ना काही त्रुटी काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केले आहेत. अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून अर्ज बाद करण्याचं राजकारण केलं गेलं. या विरोधात आम्ही राज्यपालांकडे तक्रार करू असं भाजपाचे आमदार रमेश कराड यांनी सांगितले आहे .

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांचे सर्वच अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. काँग्रेस प्रणित सहकार पॅनेलच्या दबावाखाली अधिकाऱ्यांनी भाजपाचे अर्ज बाद केले असा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. तर दुसरीकडे सहकार पॅनलचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील आणि आमदार धीरज देशमुख हे बिनविरोध निवडून आल्यानंतर समर्थकांनी अनेक ठिकाणी जल्लोष केला.

दरम्यान, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणीत सहकार पॅनेलचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर, उर्वरित 15 जागांसाठी काँग्रेसचेच 31 अर्ज शिल्लक राहिले आहेत . अर्ज मागे घेण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी आहे. 19 संचालक निवडून देण्यासाठीची निवडणूक लागली आहे.

विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाप्रणित पॅनेल उभे करण्यात आले होते. मात्र, अर्ज छाननीत या पॅनेलचा एकही अर्ज वैध ठरला नाही. त्यामुळे काँग्रेसने ही निवडणूक जिंकल्याचा फक्त सोपस्कार उरला आहे. राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील ,काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख , जळकोटचे मारोती पांडे , चाकूरचे नागनाथ पाटील यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी पहिल्यांदाच या निवडणुकीत आपली उमेदवारी दाखल केलेली नाही. त्यांनी आता आमदार धीरज देशमुख यांना बँकेच्या निवडणुकीत उतरवले आहे. भाजपनं पॅनेल उभं करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही.