रोहित पवार यांचा नकलीपणा, निलेश राणे यांनी दिले ‘हे’ पुरावे

0
342

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – : केंद्राच्या कृषी कायद्यांवरुन भाजपा नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना समजून घेण्यात कमी पडतंय, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती. आता निलेश राणेंनी ट्विट करुन रोहित यांच्यावर पलटवार केला आहे.

“शेतकरी आंदोलनावर भाष्य करुन एकीकडे शेतकऱ्यांना भडकवायचं आणि दुसरीकडे तुमच्याच कंपनीने कंत्राटी शेतीचे फायदे सांगायचे. नकलीपणा काय असतो हे बघा आता”, अशा शब्दात निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय.

“नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत”, असं म्हणत रोहित पवार यांच्या बारामती अ‌ॅग्रोचा फ्लेक्स निलेश राणे यांनी ट्विट केलाय.

रोहित पवारांच्या बारामती अ‌ॅग्रोच्या फ्लेसमध्ये काय म्हटलंय…?

  • करार पद्धतीने शेती करण्याचे फायदे
  • वर्षभर हमी भावाने खरेदी
  • शेतकऱ्याला क्रेडिटवर बेबीकॉर्न बियाणे आणि मिरचीच्या रोपांची पुरवठा
  • शून्य टक्के वाहतूक
  • विविध पिकांसाठी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन

केंद्राच्या कृषी कायद्यांवरुन देशभरात सध्या गदारोळ सुरु आहे. पारित केलेले कायदे रद्द केले जावेत, यासाठी राजधानी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे तर इकडे मुंबईतही शेकडो किलोमीटर अंतर चालून शेतकऱ्यांचा लाल जथ्था राजभवनावर धडकणार आहे. मुंबईच्या या मोर्चाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे किंबहुना आज ते मोर्चाच्या ठिकाणी स्वत: उपस्थिती लावणार आहेत.