रेन वॉटर हार्वेस्टिंग पाईपमध्ये इंजिनिअरने लपवले तब्बल 13 लाख रुपये; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कोट्यवधींची संपत्ती जप्त

0
369

बंगळुरु, दि.२५ (पीसीबी) : पैसे कमवण्यासाठी डोकं लावत शिवाय कष्ट करायचे सोडून ते आयते मिळवण्यासाठी डोकं वापरलं जाण्याच्या घटना आपल्या देशात कमी नाहीत. मात्र आपली पोलीस यंत्रणा, प्रशासन सुसज्ज असल्यामुळे बहुतांश वेळा झटपट श्रीमंतीची स्वप्नं पाहणाऱ्यांना तुरुंगातच जावं लागतं. देशातील कर्नाटकातील बंगळुरुमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या ज्युनिअर अभियंत्याची स्वप्नं उधळून लावत जवळपास 55 लाख रुपयांच्या रोकडीसह घर, शेत जमीन अशी कोट्यवधींची संपत्ती जप्त केली.

कर्नाटकातील या इंजिनिअरने मात्र डोकं वापरत थेट रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पर्जन्य जल संधारणाच्या पाईपमध्ये तब्बल 13 लाख रुपये लपवले होते. कर्नाटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी कलबुर्गी येथील या कनिष्ठ अभियंत्याच्या घरातून सुमारे 13 लाख रुपये रोख जप्त केले. दरम्यान, रेन वॉटर हार्वेस्टिंग पाईपमध्ये लपवलेल्या चलनी नोटा जप्त करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात पीडब्ल्यूडीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणाऱ्या एस. एम. बिरादार याच्या ठिकाण्यांवर छापा टाकल्यानंतर दोन घरं, बंगळुरुमधील एक जागा, तीन कार, एक दुचाकी, एक स्कूल बस, दोन ट्रॅक्टर, 54.50 लाख रुपयांची रोकड, 36 एकर शेतजमीन, 100 ग्रॅम दागिने आणि 15 लाख रुपये किमतीच्या घरगुती वस्तू जप्त केल्या आहेत. बुधवारी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली.