रुट, स्टर्लिंगसह पंतला नामांकन

0
444

दुबई, दि. २ (पीसीबी) – आयसीसीच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पहिल्या पुरस्कारासाठी भारताच्या रिषभ पंतला अंतिम नामांकन मिळाले असून, पुरस्कारासाठी त्याची इंग्लंडच्या ज्यो रुट आणि आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगशी स्पर्धा असेल. आयसीसीने या वर्षीपासून क्रिकेटच्या तीन प्रकारातील एकत्रित कामगिरीवरून महिन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरुस्कार सुरू केला आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागात हा पुरस्कार दिला जाणार आहे.

जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या मालिका विजया महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रिषभ पंतला या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. तिसरी सिडनी कसोटी अनिर्णित राखताना त्याने ९७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत ३२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने नाबाद ८९ धावा केल्या होत्या. दुसरा खेळाडू ज्यो रुट याने श्रीलंकाविरुद्ध २-० अशा इंग्लंडच्या मालिका विजयात २२८ आणि १८६ धावा अशी दोन शतके झळकाविली होती. नामांकन मिळालेला तिसरा खेळाडू स्टर्लिंग याने अमिरातीविरद्ध दोन आणि अफगाणिस्तानविरुद्ध तीन असे पाच एकदिवसीय सामने खेळताना तीन शतके झळकाविली.

महिला विभागासाठी पाकिस्तानची डायना बेग आणि दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माईल आणि मारिझने कॅप यांना नामांकन मिळाले आहे. आयसीसीच्या वतीने अंतिम पुरस्काराची घोषणा त्यांच्या डिजीटल चॅनेलवरून दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी करण्यात येणार आहे.