Sensex ने गाठला उच्चांक; शेरखान गंडला. निर्देशांकाने पुन्हा गाठली ‘एवढ्या’ हजाराची पातळी

0
278

मुंबई, दि.०२ (पीसीबी) : मुंबई शेअर बाजाराचा अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्देशांक सेन्सेक्स 48600 वर बंद झाला होता. मंगळवारी बाजार उघडताच पुन्हा एकदा तेजीचं वातावरण पाहायला मिळालं. सेन्सेक्सने तब्बल 1461 अंकांची उसळी घेत 50 हजारांचा ऐतिहासिक टप्पा पुन्हा एकदा सर केला

निफ्टीमध्येही तेजीचं वातावारण पाहायला मिळत होते. सोमवारी निफ्टी 14281 वर बंद झाला होता. मंगळवारी त्यात 200अंकांची वाढ झाल्याने निफ्टीने 14700 टप्पा गाठला होता. निफ्टी 15 हजाराचा टप्पा केव्हा गाठतोय याची गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

एकीकडे शेअर बाजारात हे आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे शेअरखानद्वारे डीमॅट खाती सांभाळणाऱ्या गुंतवणूकदारांचे चेहरे लालबुंद झाले होते. अॅप आणि वेबसाईट उघडण्यास वेळ लागत असल्याने आणि पोर्टफोलिओ पाहाता येत नसल्याने शेअरखानचे ग्राहक वैतागले होते. बाजारात तेजी असल्याने अनेकांना त्यांच्याकडे असलेले शेअर विकायचे होते. मात्र अॅपमध्ये आणि वेबसाईटवर पोर्टफोलिओच दिसत नसल्याने त्यांची पंचाईत झाली होती. अनेक ग्राहकांनी ट्विटरचा आधार घेत शेअरखानला अडचण कळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा शेअरखानवर फारसा परिणाम झालेला दिसला नाही.

अर्थसंकल्पाच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2314.84 अंकांनी वाढला होता. दिवसभरात ५ टक्के वाढीसह सेन्सेक्स 48600.61 वर बंद झाला होता. निफ्टीमध्येही जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. सोमवारी निफ्टी 646.60 अंकांनी वाढला होता आणि 14281 वर स्थिरावला होता. यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या दोन अर्थसंकल्पांवेळी सेन्सेक्स आपटला होता. यंदाही तेच चित्र पाहायला मिळेल असं काहींना वाटत होतं, मात्र असं घडलं नाही.

अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी मुंबई शेअर बाजारात घसरणीचं वातावरण पाहायला मिळालं होतं. जवळपास सहा दिवस निर्देशांक घसरत गेला होता. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकटी मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करवाढ केली जाईल अशी भीती वर्तवली जात होती. करवाढ झाल्यास कंपन्यांचा नफा कमी होईल असं बोललं जात होतं. या भीतीच्या वातावरणामुळे शेअर बाजारात नैराश्य पसरलं होतं आणि यामुळे निर्देशांकाची घसरण सुरू होती. सेन्सेक्सने तर 50 हजारांचा टप्पा गाठल्यानंतर तो झपाट्याने पडून 46 हजारांपर्यंत खाली आला होता. सोमवारी मुख्यतः बँका तसेच वित्तसंस्था यांच्या समभागांमध्ये मोठी तेजी आल्याने पाहायला मिळाले होते. त्यातुलनेत आयटी क्षेत्र, वाहन उद्योगक्षेत्र यांच्या समभागात अपेक्षित वाढ दिसली नाही.