रिक्षास खुली परवानगी द्या अन्यथा कायदेभंग आंदोलन : बाबा कांबळे

0
481

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी येथे रिक्षा चालक-मालकांनी मिळून आज सकाळी बोंबाबोंब आंदोलन. यावेळी केलेल्या मागण्यांत रिक्षाला खुली परवानगी द्या अन्यथा कायदेभंग करु असा इशारा संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला. महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचे नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले.

रिक्षाचालकांच्या वतीने केलेल्या विविध मागण्यांमध्ये रिक्षा चालकांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिना दहा हजार मिळावेत, शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्ज माफ करावे त्यांची आर सी बुक कोरे करावे, मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, ओला उबेर वर निर्बंध आणावेत, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, फायनान्स कंपनी आणि बँकेच्या वतीने हप्ते वसुलीसाठी रिक्षा चालकांना त्रास दिला जात आहे, याबाबत सक्त वसुली आणि गुंडागर्दी दादागिरी करू नये असे आदेश सरकारने संबंधित सर्व फायनान्स आणि बँकांना द्यावेत, रिक्षा चालक मालकांसाठी घरकुल योजना राबवावी, रिक्षा चालक मालकांसाठी covid-19 च्या काळात 50 लाखाचा विमा मिळावा आदी मागण्यांचे निवेदन सरकारला पाठविण्यात आले.

राज्य सरकारने लक्ष न दिल्यामुळे आणि रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवल्यामुळे रिक्षा चालकांनी संताप व्यक्त केला. सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई सावळे कुणाल वावळकर यांनी उपस्थित राहुन पाठींबा दिला. यावेळी बाळासाहेब सोनवणे, इजाज शेख, बाळासाहेब ढवळे, वकील शेख, दत्तू सरकते आदी उपस्थित होते.

यावेळी बाबा कांबळे म्हणाले, सरकारने एसटी बसला तसेच मुंबईमध्ये बेस्ट आधी पुण्यात पीएमसी वाहतुकीस परवानगी दिली. रिक्षा व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे. आज 70 टक्के रिक्षा बंद आहेत. गेली सहा महिन्यापासून बंद असलेल्या रिक्षा सेवा तात्काळ सुरू करावी. रिक्षाचालकांच्या इतरही मागण्या सोडवाव्यात अन्यथा अभिनय कायदेभंग रिक्षाचालक आपले रिक्षा सुरू करतील. दरम्यानच्या काळात बोंबाबोंब आंदोलन सुरूच राहणार आहे, असे बाबा कांबळे म्हणाले.

यावेळी बाळासाहेब भागवत म्हणाले, रिक्षाचालक हातावरच पोट असणारा घटक असून त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. यासाठी आम्ही नुकतीच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यांनीदेखील या आंदोलनास पाठिंबा दिला होता. रिक्षावाल्यानं सोबत आम्ही ठामपणे उभे आहोत सरकारने त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत असे सांगितले ,

सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजय अवतारे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 120 रिक्षा स्टँड वरती हे आंदोलन करण्यात आले.