राहुल गांधी देशभरातील १५०० प्राध्यापकांशी संवाद साधणार

0
691

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस  अध्यक्ष राहुल गांधी  देशातील सुमारे १५०० प्राध्यापकांशी संवाद साधणार आहेत. तसेच ते समाजातील सर्व वर्गातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम १८ ऑगस्ट रोजी दिल्लीतील सिव्हिक सेंटरमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. यात देशभरातील प्राध्यापकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाशिवाय ते १६ ऑगस्ट रोजी दिल्लीत विरोधी पक्षांकडून एकत्रितपणे आयोजित ‘विरासत बचाओ संमेलनात’ ही सहभागी होणार आहेत. जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये सर्व विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत.

२५ ऑगस्ट रोजी राहुल गांधी लंडन दौऱ्यावर जाणार  आहेत. तिथे ते भारतीय नागरिकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत . यापूर्वीही त्यांनी अमेरिका, सिंगापूर येथे भारतीय समाजाला संबोधित केले होते. त्यांनी स्थानिक विद्यापीठातील विद्यार्थी आणि उद्योजकांशी चर्चा केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी देशातील मुस्लीम विचारवंतांशी चर्चा करून त्यांच्याकडून काही सूचनाही मागवल्या होत्या.