राहुल गांधींनी देशाला दिला सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; कमलनाथ यांच्याकडे २०६ कोटींची संपत्ती

0
1144

भोपाळ, दि. १४ (पीसीबी) – मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपचा पराभव करून देशाच्या राजकारणात कमबॅक करणाऱ्या काँग्रेसने मध्यप्रदेशला देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री दिला आहे. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसच्या कमलनाथ यांची लवकरच निवड होणार आहे. कमलनाथ यांची २०६ कोटींची संपत्ती आहे. त्याखालोखाल आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची १७७ कोटींची संपत्ती आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसला विजय मिळाला. त्यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या तीन राज्यांत विजय मिळाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे तीनही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नवीन चेहरा देतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु, ती फोल ठरवत राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशला देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री दिला आहे.

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसच्या ७३ वर्षांचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमलनाथ यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती २०६ कोटींची असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार ते देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री ठरणार आहेत. त्याखालोखाल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची १७७ कोटींची संपत्ती आहे.