राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन

0
228

तळेगाव दाभाडे, दि. ३ (पीसीबी) येथील राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा बळवंत दिवेकर (वय 90) यांचे आज (शनिवारी) दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे ज्येष्ठ कार्यकर्ते व गणेश मोफत वाचनालयाचे अध्यक्ष प्रशांत दिवेकर यांच्या त्या मातोश्री होत.

प्रतिभा दिवेकर या राष्ट्र सेविका समितीच्या अत्यंत तळमळीच्या व निष्ठावान स्वयंसेविका होत्या. समितीच्या कामासाठी त्यांनी जीवन समर्पित केले होते. शेवटपर्यंत त्या संघकार्यात कार्यरत होत्या. समितीच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम सातत्याने राबविले.

‘दिवेकर काकू’ या नावाने त्या सर्वपरिचित होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसाठी त्यांचे घर ‘हक्काचं घर’ म्हणून अजूनही ओळखले जाते. एक आदरणीय व प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्या मावळात सुपरिचित होत्या.

संपूर्ण आयुष्य त्या सेवाभावी वृत्तीने जगल्या. पुणे जिल्हा परिषदेच्या शिवणे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी प्रदीर्घ काळ परिचारिका म्हणून सेवा केली. मावळातील खेड्यापाड्यात फिरून रुग्णसेवा केल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा होता.

तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी संघ परिवारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.