राष्ट्रवादी सोडणारे आमदार पुन्हा निवडूण येत नाहीत – पवार

0
643

सातारा, दि. २ (पीसीबी) यापूर्वीही काही आमदारांनी पक्ष सोडला होता. परंतु, त्यातील एकही जण पुढच्या निवडणूकीत निवडणूक आला नाही. त्याचप्रमाणे याही वेळी सातारची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल याची मला चिंता नाही. असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी शरद पवार गुरूवारी साताऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.

श्री पवार म्हणाले, पक्ष सोडून गेलेल्या तीनही आमदारांनी मतदार संघातील कामे होत नसल्यामुळे भाजपत जात असल्याचे सांगितले. याचा अर्थ असा की, सत्तेत असणारे लोक लोकप्रतिनिधींच्या रास्त कामांकडे लक्ष देत नाहीत, किंवा त्यांच्याशी सूडबुद्धीने वागतात असा निष्कर्ष निघतो.

श्री पवार पुढे म्हणाले की, शासकीय यंत्रणेचा यापूर्वी इतका गैर वापर केला जात नव्हता. अगदी मनोहर जोशी व नारायण राणे मुख्यमंत्री असतानाही ते झाले नाही. तरीही जास्त लोक त्यांना मिळालेले नाहीत. कामे होत नाहीत ही वस्तूस्थिती असली तरी, जिल्ह्यातील अन्य सर्व लोक आमच्या सोबत आहे. त्यांची नाळ मतदारांशी चांगली आहे. त्यामुळे त्यांना अडचण येत नाही. १९८० मध्ये मोठ्या संख्येने आमदार पक्ष सोडून गेले होते. ५८ आमदारांपैकी ५२ लोक सोडून गेले होते. आम्ही केवळ सहाजणच राहिलो होतो. परंतु, जे सोडून गेले त्यातील एकही जण नंतर झालेल्या निवडणूकीत निवडूण आला नाही. आमच्या सर्व जागा पुन्हा भरल्या. त्याच प्रमाणे सातारा मतदार संघही राष्ट्रवादीकडे असून या ठिकाणी कोण उमेदवार द्यायचा हे लवरच ठरवले जाईल.