“राष्ट्रवादीत सर्व रडे आहेत. हिंमत असेल तर राजीनामे देऊन कारवाईला सामोरे जा”; निलेश राणेंचा हल्लाबोल

0
294

सिंधुदुर्ग, दि.१० (पीसीबी) : भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादीत सर्व रडे आहेत. तपास यंत्रणांनी कारवाई करताच रडू लागतात, अशी टीका करतानाच हिंमत असेल तर राजीनामे देऊन कारवाईला सामोरे जा. मग काय होते ते पाहा, असं आव्हानच निलेश राणे यांनी राष्ट्रवादीला दिलं.

निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कुडाळ पंचायत समितीतील तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर धाडी पडत आहेत. त्यामुळे नक्कीच यामध्ये काही गडबड असणार. गडबडीसाठी अजित पवार प्रसिद्ध आहे. विधायक कामांसाठी त्यांचं नाव कुठेच प्रसिद्ध नाही. ज्या कंपन्यावर रेड पडली त्यांनी काही तरी गडबड केली आहे. अजित पवार यांनी किती लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त केली, किती लोकांना कामाला लावलं हे ते विसरले. त्यामुळे सगळेच भोगावं लागतंय. हे इथेच भोगावं लागणार आणि हे लांबपर्यंत जाणार. अजित पवार साहेब असू शकत नाही. राष्ट्रवादीत सगळे रडे भरलेले आहेत. यांच्यावर आरोप झाले की रडतात. कारवाईला सामोरं जावं आणि राजीनामा द्यावा. मग तुमचं काय होते पाहा, असं आव्हानच त्यांनी अजित पवार यांना दिलं.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावरही टीका केली. नवाब मलिक आपल्या मतदारसंघात काय करतात ते आम्हाला तोंड उघडायला लावू नका. तुमची अंडीपिल्ली आम्हाला माहिती आहेत. तुमचा जावई ड्रग केसमध्ये अडकला होता. आज तुम्ही वांद्र्यात कुणाला पण विचारा, नवाब मलिक यांचा जावई ड्रग विकतो हे तुम्हाला ऐकायला मिळेल, असा दावा करतानाच शाहरुख खान तुम्हाला हे बोलण्यासाठी पैसे देतोय का? तुम्ही एका ड्रग अॅडिक्टची साथ देत आहात हे लक्षात ठेवा, असंही ते म्हणाले.

कुडाळ पंचायत समितीच्या शिवसेनेच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. माजी पंचयात समिती सभापती आणि विद्यमान सदस्य राजन जाधव, सुबोध माधव, प्राजक्ता प्रभू यांनी भाजपमद्ये प्रवेश केला आहे. कुडाळ पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे 10 तर भाजपचे संख्याबळ आहे. एक वर्षापूर्वी कुडाळ पंचायत समितीच्या सभापतींनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तीन पंचायत समिती सदस्यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे भाजपचे संख्याबळ 8 वरून 11 वर, तर शिवसेनेचे संख्याबळ 10 वरून गेले 7 वर गेलंय. यानंतर तीन मोठे धक्के निलेश राणे शिवसेनेला देण्याच्या तयारीत आहेत. कुडाळ विधानसभा मतदारसंघ बांधणीसाठी राणे यांचे हे पहिले पाऊल असल्याचं संकेत मिळतायत. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी निलेश राणे यांच्या नावाची चर्चा आहे. त्याची मोर्चे बांधणीची ही सुरवात अ्सल्याचं मानलं जातंय. तर पक्ष प्रवेश केलेल्या सदस्यांनी आपण इथल्या आमदारांवर नाराज असल्याने आपण शिवसेना सोडल्याचं सष्ट केलंय.

शिवसेना कधी संपेल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कधीच कळणार नाही. सुरुंग लावला आहे. अनेकजण कुंपणावर आहेत. शून्य आमदारांचे पक्षप्रमुख कधी होतील ते उद्धव ठाकरेंना कळणार देखील नाही. ती वेळ लांब नाही. आज झटका दिला आहे, अजून भरपूर बाकी आहे, असा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यात संवाद झाला नाही. त्यावरही त्यांनी मिष्किल भाष्य केलं. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होण्यासारखं काही नाहीच नव्हतं. नारायण राणे मनात ठेवून काही वागत नाहीत. उद्धव ठाकरे कुसक्या मनाचे आहेत. त्याला आमचे साहेब काय करणार?, असा सवालही त्यांनी केला.