राष्ट्रवादीत दुसरी फळी निर्माण करुन नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे – शरद पवार

0
578

मुंबई, दि.१० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण चेहऱ्याचा पक्ष ही ओळख बदलायला हवी आणि शहरी भागात राष्ट्रवादीचा जोर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आजचा वर्धापन दिन राष्ट्रवादी जलदिन संकल्प म्हणून साजरा करणार आहे. दुष्काळपरिस्थिती, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गावागांवात जाऊन सकारात्मक कामे करण्याचे आवाहन करण्यात आले.

राष्ट्रवादीचा चेहरा हा ग्रामीण चेहरा आहे, पण ५० टक्के लोकसंख्या नागरी भागात आहे, हे विसरुन चालणार नाही. आता तालुक्या-तालुक्यात नागरिकरण झाले आहे. मुंबईत आपण कमी पडत आहोत, हे मान्य केले पाहिजे. म्हणून, आजच्या दिवशी हा निर्धार करुया की राष्ट्रवादीची नागरी भागातीलल व्याप्ती वाढली पाहिजे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

मुंबईत सर्व राज्यांच्या लोकांचे प्रतिनिधीत्व आहे. मुंबईकरांनी ते आनंदाने स्वीकारले आहे. तेलुगू समाजाचे मुंबईत मोठे योगदान राहिले आहे. राष्ट्रवादीत सर्व घटकांना स्थान आहे, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन चालता यायला हवे, असा सल्ला शरद पवारांनी दिला.