पवारांची गुगली.. दोष फक्त EVM,  VVPAT चा नाही निवडणूक अधिकाऱ्यांचाही!

0
330

मुंबई, दि. १० (पीसीबी) – ईव्हीएम मध्ये गडबड आहे अशी शंका घेणाऱ्या शरद पवार यांनी पुन्हा एकदा एक गुगली टाकला आहे. कारण त्यांनी आता म्हटले आहे की दोष फक्त EVM, VVPAT चा नाही तर निवडणूक अधिकाऱ्यांचाही आहे. ज्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे मतमोजणीसाठी ही मशीन्स येतात ते अधिकारीही दोषी असू शकतात असे आता शरद पवार यांनी म्हटले आहे. आम्ही या प्रकरणी तंत्रज्ञांशी आणि ईव्हीएम तज्ज्ञांशी सखोल चर्चा करणार आहोत असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच या सगळ्यांशी चर्चा झाल्यावर आम्ही विरोधी पक्षातल्या नेत्यांशीही चर्चा करू असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

आपण ज्या उमेदवाराला मत देतो आहे त्याला ते जात नाही हे मतदारांना कळले तर ते सध्या शांत रहातील पण ते भविष्यात कायदा हातात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारांनी कायदा हातात घेऊ नये म्हणून प्रयत्न केले जाणे आवश्यक आहेत तेच आम्ही करतो आहोत असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

याआधी  १ मे रोजीही शरद पवार यांनी ईव्हीएमवर शंका घेतली होती. तसेच निवडणूक प्रचारादरम्यानही मी अशी काही ईव्हीएम पाहिली आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादीचे बटण दाबल्यास कमळाला मत गेले हे मी डोळ्याने पाहिले आहे असेही वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी त्यांची खिल्लीही उडवली. आता फक्त ईव्हीएमच नाही तर निवडणूक अधिकारीही दोषी असू शकतात असे शरद पवार यांनी म्हटले आहे.