रावेतमध्ये सराईताला एक पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसांसह अटक

0
1741

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – एका सराईत आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसांसह अटक केली आहे. ही कारवाई आज (बुधवार) रावेत येथील सिल्वर पाम ग्रो सोसायटीच्या गेटजवळ करण्यात आली.

सचिन बबन मिसाळ (वय ३२, रा. सिल्वर पाम ग्रो सोसायटी सी बिल्डींग, फ्लॅट नं.१०१, रावेत) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात यापूर्वी देखील विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांना त्यांच्या खबऱ्याने माहिती दिली कि, रावेत येथील सचिन नावाच्या इसमाजवळ देशी बनावटीचे पिस्तुल आहे आणि तो नेहमी ते पिस्तुल घेऊन फिरतो. यावर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने रावेत येथील सिल्वर पाम ग्रो सोसायटीच्या गेटजवळ सापळा रचून आरोपी सचिन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवल एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी सचिन याला अटक केली. तसेच त्याच्याविरोधात अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहुरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.