राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी अयोध्येत बौद्ध मंदिर होते – रामदास आठवले

0
1085

जयपूर, दि. १६ (पीसीबी) – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राम मंदिराबाबत एक मोठे विधान केले आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी बौद्ध मंदिर होते, नंतर मुस्लिम आणि हिंदूंनी तेथील बौद्ध मंदिर पाडून तेथे राम मंदिर आणि बाबरी मशीद बांधली असे आठवले म्हणाले आहेत. आठवले यांच्या या विधानावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. आठवले यांनी अयोध्येत बौद्ध मंदिर होते, असे म्हटले असले तरीही तेथे बौद्ध मंदीर उभारण्याची त्यांनी वकिली केलेली नाही.

जयपूर येथील वृत्तवाहिनीच्या पत्रकारांसोबत बोलताना रामदास आठवले यांनी हे विधान केले. अयोध्येत मंदिर आणि मशीद दोन्हीही व्हायला हवे. तेथे राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी भगवान बुद्धांचे मंदिर होते. आज जरी राम मंदिराच्या वादग्रस्त जागेवर खोदकाम केलं तरी तेथे बौद्ध मंदिराचे अवशेष सापडू शकतात, असेही आठवले म्हणाले. मात्र, यावेळी बोलताना आठवले यांनी अयोध्येत बौद्ध मंदिर उभारण्याची वकिली न करता, त्या जागेवर राम मंदिर आणि मशिद दोन्हीही व्हायला हवे असे म्हटले. पत्रिकाने दिलेल्या वृत्तानुसार आठवले पुढे म्हणाले की, सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. पण त्या वादग्रस्त 60 एकर जागेपैकी ४० एकर जागा राम मंदिरासाठी मिळावी आणि २० एकर जागा बाबरी मशिदीसाठी मिळावी.

यावेळी बोलताना आठवले यांनी, क्रिकेट व अन्य खेळांसह सैन्यभरतीमध्येही आरक्षण दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. २०१९ मधील निवडणुकीत भाजपाला ३०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असे भाकितही त्यांनी वर्तवले आहे. कोणी कितीही आंदोलने करावीत. पण एससी- एसटी व ओबीसींना मिळालेले आरक्षण बंद करता येणार नाही. सवर्णांमध्येही सगळेच श्रीमंत नसतील. त्यामुळे जातीय आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे, असे त्यांनी सांगितले. अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. मात्र, या कायद्यातील मूळ तरतुदी कायम राहाव्यात, यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली, असे त्यांनी नमूद केले.