राम मंदिर आंदोलन पुन्हा सुरु होण्याची शक्यता; ५ ऑक्टोबरला ‘विहिंप’ची बैठक

0
402

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – अयोध्येतील राम मंदिरासाठीचं आंदोलन पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) ५ ऑक्टोबर रोजी देशतील ३६ संतांची बैठक बोलावली आहे. या संतांची समिती ५ ऑक्टोबरला राम मंदिर निर्मितीसाठी कार सेवकांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

या समितीचे प्रमुख राम मंदिर आंदोलनाचे मुख्य महंत नृत्य गोपाल दास आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, विहिंपने सर्व संतांना पत्र जारी केले असून राम मंदिराबाबत निर्णय घेण्यासाठी निमंत्रण पाठवलं आहे. याच बैठकीत राम मंदिर निर्मितीसाठी आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. या विषयावर अध्यादेश जारी करण्याबाबत विचार करायला हवा, असं ते म्हणाले होते. राम जन्मभूमीवर राम मंदिर लवकरात लवकर उभं रहायला हवं. हा प्रश्न अजून लांबू नये, असे ते म्हणाले होते.

अयोध्या वादातील दोन्ही पक्षांनी या प्रश्नावर सहमतीने तोडगा शोधल्याचा दावा १६ सप्टेंबरला राम जन्मभूमी ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राम विलास वेदांती यांनी केला होता. काही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या माध्यमातून तोडगा निघाल्याचं ते म्हणाले होते. याअंतर्गत लखनौमध्ये जगातील सर्वात मोठी मशिद बांधली जाईल. तर अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं जाईल. मशिद बाबरच्या नावावर नसेल, असंही ते म्हणाले होते.