राफेल करारावर मोदींनी १५ मिनिटे खुली चर्चा करावी; राहुल गांधींचे आव्हान  

0
472

रांची, दि. १८ (पीसीबी) – मोदींनी राफेल करारावर कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी केवळ १५ मिनिटे माझ्याशी खुली चर्चा करावी,  असे थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. त्यांनी १५ मिनिटे मला राफेलवर बोलू द्यावे आणि त्यानंतर तेवढ्याच वेळ स्वतः त्यावर बोलावे, असेही  राहुल गांधी म्हणाले.

छत्तीसगडधील विधानसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. या दरम्यान, राहुल गांधी  सरगुजा येथे एका रॅलीमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी नोटाबंदी, कर्ज बुडवणारे उद्योजक यांच्यावरुन मोदी सरकारवर हल्ला चढवला.

मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करुन सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. नोटाबंदीद्वारे त्यांनी गरीबांना बँकेसमोर रांगेत उभे केले. तुम्ही सूटबूटवाल्या लोकांना बँकेसमोर रांगेत पाहिले का?, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

मात्र, मोदींनी श्रीमंत उद्योजकांचे ३. ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले.पण गरीब शेतकऱ्यांचे कर्ज त्यांनी माफ केले नाही, असेही ते म्हणाले.  मोदीजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा लोकांकडून आम्ही पैसे वसूल करु आणि गरीब शेतकऱ्यांचे कर्जमाफ करु, असेही त्यांनी सांगितले.