राणा दाम्पत्याच्या जामिनावर आता बुधवारी सुनावणी

0
443

मुंबई, दि. २ (पीसीबी) : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची मागणी केली, आणि राज्यात एका नव्या राजकीय नाट्याला सुरूवात झाली. अनेक घडामोडींनंतर अखेर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. दरम्यान, आज निकालाचे लिखाण पूर्ण होऊ न शकल्याने आणि उद्या ईदची सुट्टी असल्याने राणा दाम्पत्याच्या जामिनावर आता बुधवारी (दि. 4) सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा न्यायालयातील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

राणा दाम्पत्याविरोधात १२४ अ कलमानुसार, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर आज सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्याने आणि युक्तीवादाचे वाचन पूर्ण होऊ न शकल्याने दाखल जामिन अर्जावरील सुनावणी आता बुधवारी सकाळी पहिल्या सत्रात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

राणा दाम्पत्याला २३ एप्रिल रोजी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली असून तेव्हापासून हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन्ही आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत. खोटे जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर असून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अशा परिस्थिती दोघांना जामीन मिळाल्यास बाहेर पडल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा युक्तिवाद मागच्या सुनावणीदरम्यान करण्यात आला होता. त्यावेळी न्यायालयाच्या व्यग्र कार्यक्रमामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.