नाना काटे, शत्रृघ्न काटे गळ्यात गळे

0
685

– पिंपळे सौदागरचे राजकिय समिकरण बदलणार

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपळे सौदागरमध्ये गेले दहा-पंधरा वर्षांपासून नाना काटे आणि शत्रृघ्न काटे या दोन बलाढ्य नगरसवेकांमध्ये मोठ्ठा सत्ता संघर्ष सुरु होता, तो आता जवळपास कायमचा संपला आहे. गाव जत्रेच्या निमित्ताने गावकीच्या विनंतीला मान देऊन या दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याने आता पंचक्रोशितील राजकारणालाही कलाटणी मिळणार आहे. दरम्यान, या घडामोडिमुळे आता भाजपाच्या पोटात गोळा आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात सधन, समृध्द भाग म्हणून पिंपळे सौदागरची ओळख आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील किमान ३० टक्के आयटी अभियंते या परिसरात राहतात. या भागात भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे राजकिय वर्चस्व आहे. त्यांचे खंदे समर्थक म्हणून २०१७ मध्ये भाजपामधून विजयी झालेले शत्रृघ्न तथा बापू काटे यांचे नाव घेतले जाते. ते सलग दोन टर्म नगरसेवक झाले. २०१७ ते २२ च्या भाजपा राजवटित महापौर, सत्ताधारी नेता आणि ते नाही मिळाले तर महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर होते. शेवटपर्यंत बापूंना भाजपामध्ये एकही महत्वाचे पद मिळाले नाही, मात्र पुन्हा नगरसवेक आणि शहराचे प्रथम नागरिक होण्याच्या दिशेने ते पावले टाकत आहेत.

पिंपळे सौदागर भागातून वैयक्तीक संपर्कावर कायम राष्ट्रवादीकडून निवडूण आलेले दुसरे नगरसवेक नाना काटे दोन वेळा नगरसवेक झाले. त्यांचाही वैयक्तीक संपर्क दांडगा आहे. त्यांचे थोरले भाऊ शंकर काटे आणि मध्यंतरीच्या काळात पत्नी शितल काटे या सुध्दा नगरसेविका होत्या. नाना काटे हे महापालिकेत विरोधी नेते होते, तर २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून चिंचवड विधानसभा निवडणूकही त्यांनी लढविली होती. अशा प्रकारे दोन्ही काटे हे तोडिसतोड असे आहेत. परस्पिरविरोधी असले तरी दोघेही स्वतःच्या ताकदिवर राजकारण करत. आता ते दोघे एक झाल्याने राजकारणातही मोठा फेरफार होण्याची शक्यता आहे.

दोन्ही काटेंचे स्वतंत्र दोन गट गावाता कार्यरत असल्याने दुहिचे वातावरण होते. यात्रेच्यावेळी मुंजोबा देवाला फूलपान कऱण्यासाठी नाना काटे आपल्या समर्थकांसह जात आणि शत्रृघ्न काटे हे स्वतंत्र आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन जात असेत. गेली अनेक वर्षे हेच वातावरण कायम असल्याने तो चर्चेचा विषय होता. नाना काटे यांनी गावच्या पुरातन महादेव मंदिरावर स्वतःच्या समर्थकांची समिती कायम ठेवली होती. त्यांना शह देण्यासाठी म्हणून बापू काटे यांनी नदिच्या किनारीच स्वतंत्र दत्त मंदिर बांधले. गणेश विसर्जनासाठी महादेव मंदिरालगत घाट होता, पण बापू काटे यांनी दत्त मंदिराजवळ दुसरा विसर्जन घात बांधला. अशा प्रकारे गावात दुहिचे राजकारण असल्याने गुण्यागोविंदाने राहणारे गावकरी त्रस्त होते. तुमचे राजकारण ठिक आहे, पण तुम्ही देवपण वाटून घेतलेत का, अशी विचारणा होऊ लागली होती. शेवटी गावच्या बैठकित दोघांमधील मतभेद बाजुला ठेऊन दोघांना एक करण्यात गावकऱ्यांना यश आले.

पिंपळे सौदागरला काटे यांची जवळपास १७०० घरे (उंबरा) आहेत, तर कुटे, भिसे, बोडके, कुंजीर, झिंजुर्डे अशा आडनावांची हजारावर घरे आहेत. काटे कंपनीत फूट होती, पण आता ते एक झाल्याने राजकारणावरही काटे मंडळींचे वर्चस्व कायम राहणार, अशीही चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. यापुढील काळात भाजपाला या भागातून मोठी गळती लागणार आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण होणार, अशीही चर्चा आहे.