राज्यात बारामतीमध्ये सर्वाधिक २ लाख ३२ हजार मतांची वाढ; मावळ मतदारसंघात १ लाख ९१ हजार मतांची वाढ

0
643

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून मतदार आणि राजकीय पक्षांमध्ये बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. बऱ्याच मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी पाहिल्यास सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदान वाढल्याचे दिसून येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत सर्वाधिक २ लाख ३२ हजार ८२९ मतांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत १ लाख ९१ हजार ३८९ मतांची वाढ झाली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी झाल्याची खूप चर्चा रंगली. परंतु, २०१४ च्या तुलनेत पुणे मतदारसंघात यंदा ४० हजार १६४ मतांची वाढ झाली आहे. वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे २३ मे रोजीच स्पष्ट होणार आहे.

राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या सर्वच मतदारसंघांमध्ये २०१४ च्या तुलनेत जवळपास तेवढेच मतदान झाल्याचे टक्केवारी सांगत आहे. प्रत्यक्षात मतदानाची आकडेवारी पाहिल्यास सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये २०१४ च्या तुलनेत मतदानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी मतदारसंघनिहाय प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी समोर घेत आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे.

पवार घराण्याची “राजकीय पॉवर” असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ आम्हीच जिंकणार असा दावा भाजपकडून केला जात आहे. या मतदारसंघात शरद पवार यांची कन्या व खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यात लढत झाली. या मतदारसंघाचा निकाल काय लागणार याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे. या मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीवरून बरेच चर्वितचर्वण झाले. बारामतीत मतदानाचा टक्का घटला असला तरी २०१४ च्या तुलनेत मतदान मात्र वाढलेले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदानाची वाढ ही बारामती मतदारसंघात झाली आहे. २०१४ च्या तुलनेत यंदा तब्बल २ लाख ३२ हजार ८२९ मतांची वाढ झाली आहे.

पवार घराण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील लढाईही प्रतिष्ठेची झाली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याशी लढत दिली आहे. मावळ मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत यंदा १ लाख ९१ हजार ३८९ मतांची वाढ झाली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी मतदान झाल्याने सोशल मीडियावर पुणेकर चेष्टेचा विषय बनला. परंतु, या मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ४० हजार १६४ मतदांची वाढ नोंदवली गेली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातही मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, मतदानाची आकडेवारी पाहिल्यास या मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा ६४ हजार ३९५ मतांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पहिल्या टप्प्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्यात लढत असलेल्या नागपूरमध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा सुमारे तीन टक्के कमी मतदान झाल्याचे दिसले. मात्र, प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी पाहता तेथील मतदानात २०१४ च्या तुलनेत ९६ हजार ७४२ मतांची वाढ झाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केवळ ८४० मतांची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते. नंदुरबारमध्ये एक लाख ६० हजार ७७२ मतांची वाढ झाली आहे. हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? नवमतदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतदार असल्याचा भाजपचा दावा खरा ठरणार की भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी होणार याबाबत उत्सुकता आहे.