मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या दहा वर्षाच्या मुलाचा आईनेच केला खून

0
680

सातारा, दि. ९ (पीसीबी) – आई आणि तिच्या प्रियकराने संगनमत करून अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या दहा वर्षाच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार (दि.२८ एप्रिल) रात्रीच्या सुमारास वाई येथील गंगापुरीत घडली.

गौरव ऊर्फ यश प्रकाश चव्हाण (वय १०) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आई अश्‍विनी प्रकाश चव्हाण (वय २९, रा. वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) व तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय ४१, रा. बावधन, ता. वाई) यांना वाई पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता चौथीत शिकणारा गौरव ऊर्फ यश चव्हाण हा शुक्रवारी रात्री गंगापुरी यात्रेतील ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परत आला नाही. त्यामुळे पालकांनी त्याचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी आईने वाई पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार मुलगा अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याच दिवशी दुपारी चारच्या सुमारास देगावच्या हद्दीत जाधव वस्तीजवळ धोम डाव्या कालव्यात मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना काही युवकांना आढळला. त्यांनी भुईंज पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, गौरव कसा बेपत्ता झाला, याबाबत त्याच्या आईकडे कसून चौकशी केली असता त्यात विसंगती दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी आईला विश्‍वासात घेतले. त्यावेळी तिने सत्य घटना सांगितली. अश्‍विनी व सचिन हे दोघेही औद्योगिक वसाहतीतील कंपनीत नोकरीला होते. तेथे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच हा खून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. अश्‍विनी ही मुलाला घेऊन कार्यक्रम पाहायला गेली होती. त्यावेळी सचिनचा फोन आल्याने दोघेही दुचाकीवरून शाहीर चौकात आले. त्यावेळी सचिनने मुलाला थंडपेयाची बाटली दिली. ती घेतल्यानंतर तिघेही दुचाकीवरून शेलारवाडी रस्त्याला धोम डाव्या कालव्याजवळ पोचले. दुचाकीवरून उतरल्यानंतर गौरवला गुंगीमुळे चालता येत नव्हते. त्यावेळी मुलाला बाटलीतून काय दिले, असा जाब अश्‍विनीने सचिनला विचारला. त्यावर सचिनने तुला आणि नवऱ्यालाही मारून टाकीन, अशी धमकी देत यशला कालव्यात ढकलून दिले. त्याने आईला हाकही मारली परंतु; अश्‍विनी काहीच करू शकली नाही. दोघांनाही बुधवारी (दि.८) अटक करण्यात आली आहे. वाईच्या न्यायालयाने दोघांनाही सोमवारपर्यंत (दि. १३) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सहायक पोलिस निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर तपास करीत आहेत.