भोसरीला पेट्रोल पंपावरील साडेसात लाखांची रोकड चोरली

0
376

पिंपरी, दि.27 पेट्रोल पंपावरील साडेसात लाखांची रोकड चोरून नेली. (पीसीबी): खिडकीचे गज कापून चोरट्यांनी पेट्रोल पंपावरील साडेसात लाखांची रोकड चोरून नेली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर भोसरी पोलिसांनी दोन तासांत आरोपींना अटक करून चोरलेली सर्व रोकड हस्तगत केली.

नारायण अप्पा पवार (वय 26) आणि रमेश प्रभू पवार (वय 22, दोघेही रा. भारतमाता नगर, दिघी. मूळगाव पाटोदा, बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील मुलाणी पेट्रोल पंपाच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला. तेथील कपाटातील साडेसात लाख रुपयांची रोकड चोरून नेली. चोरट्यांनी सीसीटिव्ही फुटेजमध्ये कॅमेऱ्यावर चादर टाकून खबरदारी घेतली होती.

गुन्हे शोध पथकातील सहायक निरीक्षक सिद्धेश्‍वर कैलासे यांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी पेट्रोल पंपावर काम करणारा नारायण पवार यांच्या हालचाली वेगळ्या वाटल्या. यामुळे पोलिसांनी त्याला खाक्‍या दाखविताच त्याने आपण आणि मावस भाऊ रमेश यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली. भोसरी पोलिसांनी अवघ्या दोन तासात गुन्हा उघडकीस आणून साडेसात लाख रुपयांची रोकड चोरट्यांकडून हस्तगत केली आहे.

पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त स्मिता पाटील, सहायक आयुक्‍त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, सहायक निरीक्षक सिद्धेश्‍वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, समीर रासकर, सुमीत देवकर, संतोष महाडिक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.