राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत पिंपरी-चिंचवडचा डंका; महापालिकेच्या थेरगाव शाळेतील मुलींनी पटकावले अजिंक्यपद

0
576

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षाच्या मुलींच्या कबड्डी संघाने बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले आहे. अजिंक्यपद मिळवलेल्या या संघातील भूमिका कमलेश गोरे आणि रूपाली त्र्यंबक डोंगरे या दोन मुलींची राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे उद्योगनगरीच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढला आहे.

अजिंक्यपद मिळवलेल्या या मुलींचा गुरूवारी स्थायी समिती सभेत गौरव करण्यात आला. शाळेचे मुख्यध्यापक सौदागर शिंदे, क्रीडा शिक्षक बन्सी आटवे, क्रिडा संघ व्यवस्थापक सोनाली जाधव, विशेष सहकार्य असणारे कृष्णराव टकले, शांताराम जाधव, संघनायक तेजल महाजन, राष्ट्रीय संघात निवड झालेली भूमिका गोरे, रूपाली डोंगरे, संघातील इतर खेळाडू कोमल राठोड, चांदनी गायकवाड, विद्या गायकवाड, सविता गवई, निकिता माळी, दियाश्री मांजरे, सरदार सलोनी, तेलंग पूजा, कडगंची कीर्ती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर व समितीचे सदस्य असलेले सर्व नगरसेवक उपस्थित होते.