राजीव गांधी मॉब लिंचिंगचे जनक; भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त ट्विट

0
398

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी आपल्या ट्विटरवरून दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधीबद्दल एक वादग्रस्त ट्विट केले आहे.  बग्गा यांनी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिंचिंग’ (राजीव गांधी हे मॉब लिंचिंगचे जनक आहेत) असा आशय असलेल्या होर्डिंग्जचा फोटो ट्विट केला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी  उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना ‘भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला’, असे वक्तव्य केले होते. याच विधानावरुन आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.  मोदींच्या या वक्तव्यावरुन वाद सुरु असतानाच बग्गा यांनी राजीव गांधींना मॉब लिंचिंगचे जनक असे म्हटले आहे.

दरम्यान, मागील वर्षी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्ष सहभागी नव्हता, असा दावा केला होता.  त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच ऑगस्ट महिन्यामध्ये बग्गा यांनी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिंचिंग’ अशी होर्डिंग दिल्लीमध्ये लावली होती. त्याच होर्डिंगचा फोटो त्यांनी आता पुन्हा पंतप्रधानांच्या विधानावरुन निर्माण झालेल्या वादानंतर ट्विट केला आहे.