राजस्थानात बसपाचा व्हिप, काँग्रेस अडचणीत

0
279

जयपूर, दि. २७ (पीसीबी) – राजस्थानातील सत्ता संघर्षात उच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप प्रलंबित असतानाच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बहुजन समाज पक्षानं थेट काँग्रेसविरोधात भूमिका घेतली असून, विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधात मतदान करण्याचे आदेश आपल्या आमदारांना दिले आहेत. यासंदर्भात बसपानं आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे.

राजस्थान मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेला सत्ता संघर्ष नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. बंड केलेल्या सचिन पायलट यांनी अद्यापही माघार घेतली नसून, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिवेशन बोलावण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे.

अशोक गेहलोत यांनी यासंदर्भात थेट राष्ट्रपतींची भेट घेण्याचा तसेच पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शनं करण्याचाही इशारा दिला आहे. या सगळ्या घटना घडत असताना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी राजस्थानात काँग्रेस विरोधात विरोधात भूमिका घेतली आहे.

गेहलोत यांनी अधिवेशन घेण्याच्या मागणीवर जोर दिल्यानंतर काँग्रेस बहुमत सिद्ध करण्याचा ठराव मांडणार असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षानं तातडीनं व्हिप जारी केला आहे. राजस्थानात बसपाचे सहा आमदार असून, त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस विरोधात मतदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काँग्रेस सरकार राजस्थानमध्ये संकटात असून तेथे सचिन पायलट यांनी इतर १८ आमदारांसह बंड केले असून बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेसने विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. राज्यपालांनी शुक्रवारी राज्य सरकारला अशी विचारणा केली होती, की सरकारला बहुमत असताना ते पुन्हा सिद्ध करण्याची गरज नाही. त्यामुळे विधानसभा अधिवेशन बोलावण्याचा प्रश्न कुठे येतो. राज्य सरकारने जो प्रस्ताव पाठवला आहे, त्यात विधानसभेचे अधिवेशन केव्हा बोलवावे याचा उल्लेख नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.