राजगुरुनगरमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्याला लघूशंका होईस पर्यंत जबर मारहाण

731

राजगुरुनगर, दि. १५ (पीसीबी) – राजगुरूनगरमधील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथे एका मुख्याध्यापकाने पहिलीच्या विद्यार्थ्याला क्षुल्लक कारणावरुन पँटमध्ये लघूशंका होईस पर्यंत जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१३) सकाळच्या सुमारास घडली.

याप्रकरणी मुलाच्या आईने खेड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण कडलग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळच्या सत्रात पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका शिकवत होत्या. परंतु त्या वर्गाबाहेर जाताच विद्यार्थ्यांनी मोठमोठ्याने बाकडे वाजवायला सुरुवात केली. हा गोंधळ पाहून शेजारील वर्गात शिकवत असलेले मुख्याध्यापक लक्ष्मण कडलग त्या वर्गात गेले. त्यांनी गोंधळ पाहून वर्गातील एका मुलाला हातानेच मारायला सुरुवात केली. कडलग यांनी केलेली मारहाण इतकी अमानुष होती की मुलाच्या पाठीवर त्याचे वळ उमटले. मारहाणीमुळे घाबरलेल्या मुलाने पँटमध्ये लघूशंका केली. शाळा सुटल्यानंतर मुलगा घरी गेला आणि त्याने घरी आईला याबाबत माहिती दिली. मुलाच्या आईने शिक्षका विरोधात खेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.